अनगरच्या पाटील विद्यालयात विविध उपक्रमांनी संविधान दिन उत्साहात साजरा
अनगर (कटूसत्य वृत्त):- भारतीय संविधानातील लोकशाही मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, तसेच संविधानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (ता. २६) विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांनी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य महादेव चोपडे होते. प्राध्यापिका उज्ज्वला घोलप यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, संविधान सभेचे कार्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, तसेच भारतीय लोकशाही व्यवस्थेत संविधानाचे असलेले महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी संविधानाचे सामूहिक वाचन करून संविधानाप्रती आदर व्यक्त केला.
संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. उपप्राचार्य माधव खरात यांनीही आपल्या मनोगतातून संविधानाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये आपल्या आचरणात आणावीत, असे आवाहन केले.
या दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील स्काऊट-गाईड व आर.एस.पी.च्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये यांचा संदेश देण्यात आला. विद्यालय परिसरात संविधान दिनानिमित्त आकर्षक सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी या सेल्फी पॉइंटवर छायाचित्रे काढून संविधान दिनाच्या आठवणी जतन केल्या.
विद्यालयाच्या ग्रंथालयाच्या वतीने संविधानविषयक पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच अखंड वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संविधान, भारतीय लोकशाही, राष्ट्रनिर्मिती आणि घटनात्मक मूल्यांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली.
संविधान दिनानिमित्त आयोजित या विविध उपक्रमांमुळे विद्यालय परिसरात संविधानमय वातावरण निर्माण झाले होते. केवळ संविधान दिन साजरा न करता संविधानातील विचार आणि मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमांतून करण्यात आला.
यावेळी प्राचार्य महादेव चोपडे, उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके, ज्येष्ठ शिक्षक परमेश्वर थिटे , उज्ज्वला घोलप, माधवी पाचपुंड, रवींद्र बोडके, सत्यवान दाढे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महादेव पवार यांनी सूत्रसंचालन केले तर माधव खरात यांनी आभार मानले.
.png)
No comments:
Post a Comment