जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळीची शपथ
अकलूज (कटूसत्य वृत्त):- पणतीचा उजेड आणि दिव्याची आरास आनंदाने उजळु दे प्रत्येकाचा श्वास निसर्गाची साथ देऊन अशी दिवाळी साजरी करून चला यंदा पर्यावरण पूरक दिपावली आपण साजरी करू या.दिवाळीचा सण म्हणजे आनंदाचा,उत्साहाचा आणि प्रकाशाचा उत्सव.वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे.यावर मात करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना निसर्गाची गोडी लावण्यासाठी अकलूज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर २ येथे यंदाची दिवाळी पर्यावरण पूरक आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त व पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करूया अशी प्रेरणादायक शपथ शाळेतील शिक्षक श्रीकांत राऊत सर यांनी सर्व मुलांना दिली.ही शपथ घेऊन विद्यार्थ्यांनी सर्व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.सध्या बाजारात मिळणारे फटाके व त्यामुळे वाढत चाललेले ध्वनी प्रदूषण,वायू प्रदूषण व आरोग्यावर होणारे त्याचे दुष्परिणाम शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले यावर उपाय म्हणून फटाक्यांच्या खर्चातून मुलांनी पुस्तके,पणती व मिठाई खरेदी करण्याचा संकल्प केला.दिव्यांच्या या सणात फटाक्यांची आतिषबाजी करणे ऐवजी पणत्या लावून सगळीकडे उजेड पसरवण्याची प्रतिज्ञा मुलांनी अतिशय उत्साहाने घेतली.शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाश कंदील तयार करणे,विविध पणत्या सजवणे हा उपक्रम अतिशय आनंदाने पार पाडण्यात आला.मुलांनी त्यांच्या विविध कल्पक त्याचा वापर करून आकर्षक असे आकाश कंदील तयार केले व मुलांना स्वनिर्मितीचा आनंद ही मिळाला.
मानवी मनोऱ्याचा वापर करून आकर्षक मोठी अशी पणती ही तयार केली त्यामुळे मुलांना स्वतः त्या पणतीमध्ये सहभागी असल्याचा आनंदही मिळाला.या पणतीमध्ये मुलांना आपण अंधार दूर करून सर्वांना प्रकाश दिला पाहिजे असा संदेश देण्यात आला.या पणतीमध्ये स्वतः सहभागी असल्यामुळे मुलांना खूप आनंद झाला.या कार्यशाळेसाठी माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी महेश गवळी, विस्ताराधिकारी सौ.भक्ती नाचणे मॅडम व केंद्राचे केंद्रप्रमुख सुरज कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यशाळेमध्ये मुले नंबर २ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुकुमारी अंगुले,श्रीमती मनिषा बळवंतराव,तय्यब शेख,दत्तात्रय गायकवाड,श्रीमती अंजली अडाणे,श्रीमती फातिमा मुलाणी, श्रीकांत राऊत,श्रीमती हजराबी बांगी या सर्वांचे सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment