आजपासून मुंबईचं दूध आणि भाजीपाला रोखणार
ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक, आंदोलन पेटलं
कोल्हापूर (कटूसत्य वृत्त):- ऊसाला प्रतिटन 4 हजार 500 रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज (ता. ३) किणी टोलनाक्यावर बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आले.
हजारो शेतकऱ्यांनी टोलनाका बंद पाडत महामार्गावर ठिय्या मांडला आहे. 10 तास महामार्ग रोखूनही तोडगा न निघाल्याने राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. तोडगा नाही निघाल्यास ,आज दुपारपासून मुंबईचा भाजीपाला आणि दूध रोखण्याचा इशारा दिला आहे. आमची दिवाळी होऊ दिली नाही... तर तुमची ही दिवाळी होऊ देणार नाही, असा दम राजू शेट्टींनी साखर कारखानदारांना दिला आहे.
आमची दिवाळी होऊ दिली नाही... तर तुमची ही दिवाळी होऊ देणार नाही असा सज्जड दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टींनी कारखानदारांना दिला आहे. एवढेच नव्हे तर शहरात येणारा भाजीपाला आणि दूध देखील रोखण्याचा इशारा देत त्यांनी कारखानदारांना ऊस दरावर तोडगा काढण्याचा अल्टीमेटम दिलाय. तुमच्या हातात आजची रात्र आहे...उद्या पर्यंत जर निर्णय घेतला नाही तर मात्र तुमचे वाईट दिवस चालू होतील असा दम भरत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय स्वाभिमानीने घेतला आहे.
ऊसाला चार हजार पाचशे रुपये दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सकाळपासून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग गेल्या दहा तासापेक्षा अधिक काळ रोखून धरलाय. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालीय. शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील उसदराची कोंडी अद्याप कायम आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीतही कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इशारा दिला आहे. .
उचल निश्चित झाल्याशिवाय उसाचे कांडकेही तोडू देणार नाही, संघटनेचा इशारा
साखर प्रतिक्विंटल 4 हजार 700 ते 5 हजार 600 रुपये दराने विकली जात असताना उसाला 4 हजार 500 रुपये पहिली उचल देण्यास कारखानदारांची टाळाटाळ का, असा सवाल शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे. पहिली उचल निश्चित झाल्याशिवाय उसाचे कांडकेही तोडू देणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment