सोलापूरात शेतकऱ्यांचा ठिय्या; तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा आंदोलकांचा निर्धार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 17, 2026

सोलापूरात शेतकऱ्यांचा ठिय्या; तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा आंदोलकांचा निर्धार

 सोलापूरात शेतकऱ्यांचा ठिय्या;  तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा आंदोलकांचा निर्धार


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गाळप हंगाम सुरू होऊन महिना उलटूनही ऊसदर जाहीर न झाल्याने सोमवारी दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भेदून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धडक दिली.

प्रतिटन ३,५०० रुपये पहिली उचल आणि ७०-३० सूत्रानुसार वाढीव दर जाहीर होत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार करत आंदोलकांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत कारखानदारांशी संपर्क साधून घेतलेल्या बैठका निष्फळ ठरल्याने संतप्त आंदोलकांच्या जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

अंधाराचे साम्राज्य आणि रस्त्यावरच पंगती…

कारखानदारांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, समोरील रस्ता आणि लगतच्या इमारतींच्या अवतीभोवती जागा मिळेल तिथे बसून मुक्काम ठोकला. रात्री उशिरापर्यंत तिथेच जेवणाच्या पंगती उठल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावरील खांबांवरील पथदिवे व परिसरातील वीज पुरवठा बंद असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. महापालिका प्रशासनाने वीज पुरवठा जाणीवपूर्वक बंद ठेवल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

‘शेतकरी थंडीत रस्त्यावर, नेते सत्तेच्या उबेत’ - पदाधिकाऱ्यांची टीका…

आंदोलनस्थळी उपस्थित शेतकऱ्यांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला. “शेतकऱ्यांना ऊसदराची चिंता सतावत असताना जिल्ह्यातील नेतेमंडळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे राजकीय डावपेच टाकण्यात मश्गूल आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बहुतांश कारखानदारांसह त्यांचे समर्थक आणि नेतेमंडळी सक्रिय आहेत. पालकमंत्र्यांनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गांभीर्य नाही. शेतकरी दरासाठी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर बसून आहेत, तर नेतेमंडळी सत्तेची ऊब मिळवण्यासाठी धडपडत आहेत,” अशी टीका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

कारखानदारांची संघटित गुन्हेगारी; राजू शेट्टी…

आवारातील ट्रॅक्टर ट्रॉलीवरून मार्गदर्शन करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर तीव्र हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “सोलापूरचे कारखानदार दरोडेखोर आहेत. पावसाळ्यात नदी भरून वहात असताना वीज पुरवठा बंद ठेवला. त्यानंतर धरणातील पाणी कर्नाटकात सोडून दिले. पण, जिल्ह्यातील तलाव भरून घेतला नाही. शेतकर्यांना हक्काचे पाणी मिळू न दिल्याने ऊस वाळला, शेतकऱ्यांना ऊस तोडायला भाग पाडले; ही कारखानदारांची एकजुटीने केलेली संघटित गुन्हेगारी आहे. शेतकऱ्यांकडून कमी दरात ऊस घेऊन आणि तो कमी दरात साखर विकून कारखानदारांनी स्वतःचा लाभ साधला. साखर उद्योगात खोडा घालण्याचे आणि बाजारपेठेत अडचणी निर्माण करण्याचे काम सोलापूरच्या कारखानदारांनी केले आहे. साखरेचे भाव वाढले असते तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला असता; मात्र येथील कारखानदारांनी साखर उद्योग आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. देशातील ३० लाख टन साखरेचा हिशेब केंद्रीय सहकार मंत्र्यांना द्यावा लागेल.”

शेतकऱ्यांना आवाहन करताना शेट्टी पुढे म्हणाले की, “मी तुमच्याबद्दल नाराज होतो, पण तुमचा आक्रोश पाहून तुमच्यासाठी पुन्हा आलो आहे. डोक्यातील सर्व जळमटे काढून टाका; मी या पक्षाचा, त्या गटाचा किंवा जातीचा हे सोडून द्या, सगळा शेतकरी एकच आहे. जोपर्यंत तुम्ही एक होत नाही, तोपर्यंत कोणी काही वाकडे करणार नाही. शेजारील जिल्ह्यांत आणि कर्नाटकात ३,४०० ते ४,२०० रुपये दर मिळत असताना सोलापुरातील कारखानदार केवळ तीन हजार रुपये देऊन लूट करत आहेत. तुमचा सगळा ऊस गाळप करण्याची जबाबदारी मी घेतो, फक्त तुम्ही खंबीर राहा. जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी यामध्ये पडू नये, दर कसा काढायचा हे आम्ही पाहतो. आठवडा झाला आहे, प्रश्न लवकर मिटवा अन्यथा तीव्र रास्ता रोको करू.”

सरकार सत्तेवरून खाली खेचू : महादेव जानकर…

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी राज्य शासनावर टीकास्त्र सोडले. “कारखानदार चोर असून राज्य शासन त्यांना पाठीशी घालत आहे. हे सरकार आम्ही सत्तेवर आणले, आता आम्हीच त्यांना सत्तेवरून खाली खेचू,” असा इशारा जानकर यांनी दिला. या आंदोलनात प्रा. सुहास पाटील, विजय रणदिवे, दीपक भोसले, प्रभाकर देशमुख, संजय कोकाटे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages