दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपळवटे गावात फायनान्स व मायक्रोफायनान्स वसुलीदारांना प्रवेशबंदी!
जनशक्ती शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा
करमाळा (कटूसत्य वृत्त):- राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि महिला आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत फायनान्स व मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या वसुली प्रतिनिधींकडून कर्जवसुलीसाठी नागरिकांवर दबाव टाकणे, घरोघरी जाऊन तगादा लावणे आणि मानसिक त्रास देण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा ठाम पवित्रा जनशक्ती शेतकरी संघटनेने घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर करमाळा विधानसभा मतदारसंघातील उपळवटे गावात फायनान्स व मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या वसुलीदारांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. दुष्काळामुळे आधीच शेतकरी आणि सामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत असताना कर्जाच्या वसुलीसाठी होणारा तगादा अन्यायकारक असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.
संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी वसुलीच्या नावाखाली त्रास देऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. 'संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा द्या; वसुलीच्या नावाखाली त्रास देऊ नका!' असा स्पष्ट संदेश जनशक्ती शेतकरी संघटनेने दिला आहे.
उपळवटे गावात लावलेल्या बॅनरवर
उपळवटे गावात प्रवेश बंदी
फायनान्स व मायक्रो फायनान्सच्या वसुलीदारांना
उपळवटे गावात प्रवेश बंदी..!
दुष्काळाने शेतकरी-शेतमजूर हवालदिल; कर्जवसुलीचा तगादा आता सहन करणार नाही..!प्रवेश बंद आहे!
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व महिला आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कर्जवसुलीसाठी घरोघरी जाऊन तगादा लावणे, दबाव टाकणे व मानसिक त्रास देणे खपवून घेतले जाणार नाही.
संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा द्या; वसुलीच्या नावाखाली त्रास देऊ नका!
जनशक्ती शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष:- अतुल खुपसे पाटील अशा आशयाचा बॅनरवर मजकूर आहे
जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या भूमिकेमुळे उपळवटे गावातील कर्जवसुलीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

No comments:
Post a Comment