मराठवाड्यातील दुष्काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 2, 2026

मराठवाड्यातील दुष्काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मराठवाड्यातील दुष्काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘प्रौढ प्रताप पुरंदर’ ऐतिहासिक महानाट्याला हजारोंच्या समुदायाची उपस्थिती






छत्रपती संभाजीनगर,(कटूसत्य वृत्त):-   दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेत आज ६ कोटी १८ लाख रुपयांचा धनादेश दिल्याबद्दल आभार व्यक्त करताना बळीराजाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दिली.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र सेवा महोत्सव समितीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जबिंदा मैदान, बीड बायपास येथे ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शेतकऱ्यांना नवी प्रेरणा आणि बळ मिळणार आहे. छत्रपतींच्या विचारांवर शासन काम करीत असून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार नारायण कुचे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, ह.भ.प. भास्करगिरी महाराज, महंत रामगिरी महाराज, श्री महंत शिवाजी महाराज आणि ह.भ.प. महंत विष्णू महाराज शास्त्री यांची विशेष उपस्थिती होती.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, चारा उपलब्धतेचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांसमोरील अडचणी लक्षात घेऊन शहरातील उद्योजकांनी सामाजिक बांधिलकीतून मदतनिधी संकलित केला. या उपक्रमातून संकलित झालेला ६ कोटी १८ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्योजकांनी दाखविलेली एकजूट महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून संघर्ष, स्वाभिमान, लोककल्याण आणि शेतकरीहिताचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही मुख्यमंत्री यांनी केले. छत्रपतींच्या विचारांचा वारसा स्मरणात ठेवण्यासाठी त्यांनी हजारोंच्या समुदायाला साद घातली. तत्कालीन परिस्थितीचे स्मरण करून शिवरायांचा पराक्रम, त्यांचा संघर्ष आणि स्वराज्यनिर्मितीमागील प्रेरणा जाणून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. छत्रपतींच्या विचारांवर आधारित लोककल्याणकारी शासनाची भूमिका असून, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती महेंद्र वसंतराव राजेमहाडिक यांनी केली. हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी या ऐतिहासिक महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसोबत या नाट्याचा आस्वाद घेतला. जवळपास १५ हजारावर प्रेक्षक उपस्थित होते.

देवेंद्र सेवा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र साबळे पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाने ऐतिहासिक वारशाचे स्मरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्योजकांनी दिलेले योगदान मराठवाड्यातील सामाजिक एकजुटीचे प्रतीक ठरले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध संस्थांच्या महंतांचे पाद्यपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच देवेंद्र समितीच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक हजार पाण्याच्या टाक्या व महिला सक्षमीकरिता ५०० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages