अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 23, 2026

अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार




  • अजितदादांनी पाहिलेले पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे
  •  दुष्काळामुळे स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी आतापासूनच नियोजन करा; पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचना

पुणे(कटूसत्य वृत्त):-     पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी आदरणीय अजितदादांनी दिलेला वेळ, घेतलेले कष्ट आणि दाखवलेली निष्ठा यांची जाणीव प्रत्येकाला आहे. या शहराला सुंदर, नियोजनबद्ध आणि विकसित शहर बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. शहर घडवताना त्यांनी अनेक माणसेही घडवली. पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. शहराच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी खंबीरपणे पाठीशी असून शहरातील सुरू असलेली सर्व विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये श्रीमती पवार यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महापौर रवि लांडगे, उपमहापौर श्रीम.शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे डॉ. राजेश देशमुख, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, दुष्काळी परिस्थिती, वाढती लोकसंख्या आणि बदलत्या नागरी गरजांमुळे अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. अजितदादांच्या विकासाच्या दृष्टीने मोठ्या अपेक्षा होत्या. सर्वांनी शहराच्या विकासासाठी विशेष लक्ष द्यावे, ही त्यांची इच्छा होती. शहराच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक बाबीसाठी ते नेहमी निधी उपलब्ध करून देत असत. आज देशात पिंपरी-चिंचवड शहराचा उल्लेख झाला की अजितदादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

मोशी येथील कचरा दुर्घटना अत्यंत वेदनादायी होती. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मोशी येथील दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी कचरा नेणे थांबवण्यात आले. त्यानंतर शहरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट संदर्भात माहिती घेतली. कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे. मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. या प्रकल्पाचे काम सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती घेऊन प्रकल्पाचे काम प्रलंबित न ठेवता ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

दुष्काळी परिस्थिती आणि स्थलांतराचे नियोजन करा

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे विविध भागांतून नागरिक रोजगार आणि इतर कारणांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानक निर्माण होणारा लोकसंख्येचा भार लक्षात घेऊन पाणीपुरवठा, निवारा, आरोग्य, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, पवना आणि इंद्रायणी नद्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी तसेच नदी पुनरुज्जीवनाच्या कामांना गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक यावी, यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. तसेच नाशिक फाटा ते एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगून राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा देशातील अग्रगण्य आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. अजितदादांनी या शहरासाठी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. शहराच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक अडचणीच्या वेळी महापालिका प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages