सीओपीडी दिनानिमित्त श्वास चेस्ट क्लिनिकमध्ये रविवारी मोफत तपासणी शिबिर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 18, 2026

सीओपीडी दिनानिमित्त श्वास चेस्ट क्लिनिकमध्ये रविवारी मोफत तपासणी शिबिर

 सीओपीडी दिनानिमित्त श्वास चेस्ट क्लिनिकमध्ये रविवारी मोफत तपासणी शिबिर

दमा तपासणी, स्पायरोमेट्री, पीएफटीसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्वसनविकारांबाबत जनजागृती निर्माण करणे, फुफ्फुसांचे आरोग्य जपण्याचे महत्त्व पटवून देणे आणि श्वसनविकारांचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने जागतिक सीओपीडी दिनानिमित्त रंगभवन परिसरातील श्वास चेस्ट क्लिनिकच्या वतीने रविवार, २२ नोव्हेंबर रोजी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात नागरिकांना मोफत दमा तपासणी, स्पायरोमेट्री, पीएफटी (फुफ्फुस कार्यक्षमता चाचणी) तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती डॉ. सुयश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या शिबिरामध्ये श्वसनाशी संबंधित विविध तक्रारींची तपासणी करून नागरिकांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषतः दीर्घकाळ खोकला, वारंवार धाप लागणे, श्वास घेताना घरघर होणे, छातीत घट्टपणा जाणवणे अशा तक्रारी असणाऱ्या नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.

याबाबत माहिती देताना श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. सुयश पाटील यांनी सांगितले की, सीओपीडी हा फुफ्फुसांशी संबंधित दीर्घकालीन आजार असून, सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. धूम्रपान, वाढते वायुप्रदूषण, धूळ, चुलीचा धूर आणि रासायनिक प्रदूषण यांसारख्या घटकांमुळे फुफ्फुसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे श्वसनाचा त्रास जाणवणाऱ्या व्यक्तींनी वेळेत तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

स्पायरोमेट्री आणि पीएफटी या तपासण्यांच्या माध्यमातून फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासता येते. त्यामुळे श्वसनविकारांचे निदान आणि पुढील उपचारांची दिशा निश्चित करण्यास मदत होते. श्वास चेस्ट क्लिनिकमध्ये एफओटी (FOT) मशीनची सुविधाही उपलब्ध असून, श्वसनविकारांच्या तपासणीसाठी या आधुनिक सुविधेचा उपयोग केला जात असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

सीओपीडी आणि दम्यासारख्या श्वसनविकारांबाबत नागरिकांनी जागरूक राहावे, लक्षणे अंगावर न काढता वेळेत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांनी या मोफत तपासणी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुयश पाटील यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस तन्वीर कोटी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages