नानाच्या जाण्याने हजारो बहिणींचा आधार गेला...l - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 8, 2026

नानाच्या जाण्याने हजारो बहिणींचा आधार गेला...l

 नानाच्या जाण्याने हजारो बहिणींचा आधार गेला...l



२०१५-१६ चा काळ... महाराष्ट्राच्या काळजात दुष्काळाने मोठं भगदाड पाडलं होतं. शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला जात होता, आत्महत्यांच्या बातम्या रोजच्या झाल्या होत्या. तेव्हा मुंबईच्या मायानगरीतून दोन माणसं कुठलाही गाजावाजा न करता धावून आली - नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. सप्टेंबर २०१५ मध्ये त्यांनी 'नाम फाउंडेशन' उभं केलं. कॅमेऱ्यापासून दूर, बीडच्या बांधावर जाऊन त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींच्या हातात १५ हजाराचा चेक ठेवला. तो चेक नव्हता, तो उद्ध्वस्त झालेल्या संसाराला दिलेला जगण्याचा आधार होता.

तोच आधार घेऊन १४ मार्च २०१६ रोजी नानाजी पाटेकर आणि मकरंद अनासपुरे सर सोलापुरात आले. या कार्यक्रमाचं आयोजन बळीराजा शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा संजय पाटील- घाटणेकर यांनी सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन येथे केलं होतं. रंगभवन मध्ये १९७ भगिनी डोळ्यात पाणी आणि पदरात दोन लहान लेकरं घेऊन नानाची वाट पाहत होत्या.

त्या दिवशी फक्त १५ हजाराचा चेक नव्हता दिला तर,नानांनी  माणुसकीचं दर्शन घडवलं. कुणाला शेळ्या घेऊन दिल्या, तर कोणाला म्हशी घेऊन दिल्या. 

 कुणाला ५० हजार, कुणाला लाख, कुणाला दोन लाख...अशी एकूण ६५ लाखांची मदत त्या एका दिवसात त्या भगिनींच्या पदरात पडली.

आणि त्याच मंचावर सोलापूरचे कुमार करजगी दादा उभे होते. त्यांनी मायेचं पांघरूण म्हणून १९७ चादरी आणि माहेरची साडी म्हणून १९७ साड्या त्या भगिनींना दिल्या. तेव्हा नानाने माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, "तुमच्यासारखे पत्रकार आमच्या कामात मदतीला येतात, हेच खरं बळ आहे."

"तुम्ही खचू नका, एक फोन करा... लढा, पडू नका" - नानाची ती एक थाप आजही त्या १९७ भगिनींना फाटका संसार शिवायचं बळ देते.

यंदाच्या दुष्काळातही नाना मला म्हणाले होते, "कृष्णकांत, दिवाळीपूर्वी सोलापुरातूनच सुरुवात करू." त्या शब्दावर मी कामाला लागलो होतो. माझे परममित्र बार्शीचे पत्रकार अजित कुंकूलोळ यांनी तर २ हजार रुपयांचे ब्लँकेट आणि साडी द्यायचं कबूलही केलं होतं. सगळी जुळवाजुळव सुरू असतानाच गुरुवारी ८/१०/२०२६ रोजी पहाटे नाना निघून गेले.

रंगभवनातल्या त्या १९७ बहिणी आज पुन्हा पोरक्या झाल्या. 2016 ते 2026 या दहा वर्षाच्या कालामध्ये सोलापूर जिल्ह्यात 139 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना मदत देण्याचं नियोजन  करत होतो. या कार्यक्रमाला येण्याचं नानाने आश्वासन दिलं होतं .पण नियतीला हे मान्य झालं नसावं, म्हणूनच तिने नानाला आमच्यातून हिरावून घेतलं. नानाजी तुमच्या जाण्याने एक कलाकार नाही गेला, हजारो बहिणींचा भाऊ गेला.

नानाजी, तुम्हाला सलाम. तुम्ही लावलेलं माणुसकीचं रोप मी माझ्या परीने असंच जगवत राहीन.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages