माढा शहराच्या प्रस्तावित नवीन पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता
(कटूसत्य वृत्त):-माढा शहराच्या प्रस्तावित नवीन पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देऊन निधी मिळावा व मनकर्णा नदीस कालव्याचा दर्जा द्यावा व सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मनकर्णा नदीत सिना - माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माढ्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे.
जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे माढयाच्या प्रस्तावित नवीन पाणीपुरवठा योजनेस मंजूरी व निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती झुंजार भांगे यांनी दिली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानाअंतर्गत प्रस्तावित माढा शहर पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. माढयाची पाइपलाइन ही ग्रामपंचायतकालीन असून ३० वर्षे जुनी आहे. त्यामुळे सर्व पाईपलाईन जीर्ण झालेली आहे. त्यामुळे पाईपलाईन वारंवार गळती होवून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.
या निवेदनात माढा नगरपंचायतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महामियानाअंतर्गत ५२ कोटी ७५ लाख रुपयांचा सविस्तर पाणीपुरवठा योजना प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्तावास तांत्रिक मान्यता घेऊन, प्रशासकीय मान्यतासाठी सदर प्रस्ताव मुंबईतील नगरपरिषद प्रशासन संचालनालय (डीएमए) कार्यालयास सादर केलेला होता. सदर कार्यालयाने प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी नगरविकास खात्याच्या सचिवांकडे पाठवलेला आहे. या प्रस्तावास अद्यापपर्यंत प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. माढा शहरास नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होणे आवश्यक आहे. तरी माढा शहरास नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होण्याच्या प्रस्तावास तात्काळ प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच माढा भागातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील पाणी पातळी वाढण्यासाठी मनकर्णा नदीला कालव्याचा दर्जा देण्यात यावा व माढा शहराचा सिना - माढा उपसा सिंचन योजनेत समावेश करण्यात यावा.
या मागण्यांचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, नगरपंचायतीच्या गटनेत्या संजीवनी भांगे, नगरसेवक चंद्रशेखर गोटे, माजी नगरसेवक दिनेश गाडेकर यांच्या लेटरहेडवरती करण्यात आले आहे.
यासाठीचे निवेदन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्यासमवेत माढ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, नगरसेवक चंद्रशेखर गोटे, माजी नगरसेवक दिनेश गाडेकर, समर्थ भांगे, शिवरंग गोटे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment