मोहोळ मतदारसंघात रोहयोची कामे तातडीने सुरू करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 8, 2026

मोहोळ मतदारसंघात रोहयोची कामे तातडीने सुरू करा

 मोहोळ मतदारसंघात रोहयोची कामे तातडीने सुरू करा

आ. राजू खरे यांची मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे मागणी



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ विधानसभा मतदारसंघात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेची (रोहयो) कामे मोठ्या प्रमाणात व तातडीने सुरू करावीत, अशी मागणी आमदार राजू खरे यांनी केली आहे.

या संदर्भात आ. राजू खरे यांनी रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट घेऊन मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. दुष्काळग्रस्त भागांना प्राधान्य देऊन रोजगार निर्मितीची कामे सुरू करण्याबाबत शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील गावांमध्ये स्थानिक गरजांचा विचार करून कामांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दुष्काळामुळे शेतीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या माध्यमातून गावातच काम उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे आ. खरे यांनी सांगितले.

यासाठी जलसंधारण, मृदसंधारण, सिंचन, पाणी उपलब्धता वाढविणारी कामे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन तसेच ग्रामीण पायाभूत सुविधांशी संबंधित कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. रोजगार उपलब्ध करून देतानाच ग्रामीण भागाच्या दीर्घकालीन विकासाला हातभार लागेल, अशा कामांना प्राधान्य देण्याची भूमिका आ. खरे यांनी मांडली.

चौकट : कामे सुरू होण्यास प्रशासकीय विलंब नको

दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना तातडीने दिलासा मिळावा, रोजगार हमीची कामे सुरू करण्यास प्रशासकीय विलंब होऊ नये आणि त्यासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आ. राजू खरे यांनी केली. मतदारसंघातील जनतेच्या हाताला काम मिळावे आणि गावांच्या विकासाला गती मिळावी, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages