उजनी धरणक्षेत्रातील प्रकल्पांना विरोध; जनतेने मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे – ॲड. सविता शिंदे
करमाळा (कटूसत्य वृत्त):- उजनी धरणक्षेत्रात प्रस्तावित असलेल्या ए.आय. डेटा सेंटर, तरंगते सौर पॅनल, ग्रीन हायड्रोजन आणि लघु अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध करण्यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी पुणे-सोलापूर महामार्गावरील रांजणी येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. सविता शिंदे यांनी केले आहे. अवर्षणप्रवण असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतीला उजनी धरणामुळे मोठा आधार मिळाला आहे. धरणाच्या पाण्यावर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेती बागायती झाली असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होण्यास मदत झाली आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक भागांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यात उजनी धरणाची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, उपलब्ध पाणी शेती आणि पिण्याच्या गरजांसाठी पुरेसे नसताना धरणक्षेत्रात विविध मोठे प्रकल्प प्रस्तावित केले जात असल्याबद्दल ॲड. शिंदे यांनी चिंता व्यक्त केली.
शेती, पाणी आणि पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती..
उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या ए.आय. डेटा सेंटर, तरंगते सौर पॅनल, ग्रीन हायड्रोजन आणि लघु अणुऊर्जा प्रकल्पांमुळे शेती, पाण्याचे नियोजन, पर्यावरण, स्थानिक रोजगार आणि सुरक्षिततेवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पांचे संभाव्य परिणाम, त्यासाठी आवश्यक असलेली संसाधने आणि स्थानिक नागरिकांवर होणारे परिणाम याबाबत शासनाने पारदर्शकपणे माहिती द्यावी, अशी मागणी या प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांकडून केली जात आहे.
जनतेला विश्वासात घेण्याची मागणी..
सरकारकडून अशा प्रकल्पांबाबत स्थानिक जनतेला पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोप ॲड. सविता शिंदे यांनी केला. उद्योगपतींना लाभ मिळवून देण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय दबावामुळे जनहिताला बाधा आणणारे प्रकल्प राबविले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा प्रकल्पांना ठाम विरोध करून ते हाणून पाडण्यासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गावोगावी जनजागृती; विविध पक्ष-संघटनांचा सहभाग..
प्रस्तावित प्रकल्पांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावोगावी जाऊन माहिती दिली जात आहे. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होत असल्याचे ॲड. शिंदे यांनी नमूद केले. वेगवेगळ्या पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते एका मुद्द्यावर एकत्र येत असल्याची बाब सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने प्रस्तावित प्रकल्पांबाबत शासनाने स्थानिक नागरिकांच्या शंका दूर कराव्यात, संभाव्य परिणामांची माहिती द्यावी आणि जनतेला विश्वासात घ्यावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांकडून मांडली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी पुणे-सोलापूर महामार्गावरील रांजणी येथे होणाऱ्या आंदोलनात शेतकरी, नागरिक आणि विविध पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. सविता शिंदे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment