दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या दारी झी २४ तासची ‘आनंदाची दिवाळी’!
अभिनेते प्रवीण तरडे आणि मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्या उपस्थितीत शिवणी गावात दिवाळीचा आनंद; शेतकऱ्यांना मिठाई व साड्यांचे वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन झी मीडियाच्या ‘झी २४ तास’ या मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी गावात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. ‘आनंदाची दिवाळी’ या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलवण्याचा संवेदनशील प्रयत्न करण्यात आला. मराठी चित्रपट अभिनेते प्रवीण तरडे आणि झी २४ तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला.
मागील वर्षी महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या जखमा ताज्या असतानाच यंदा कोरड्या दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या निमित्ताने हास्य फुलवण्यासाठी झी २४ तासच्या टीमने थेट शिवणी गाव गाठले. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
यावेळी अभिनेते प्रवीण तरडे आणि मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि परिस्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या घरांसमोर आकाशकंदील लावून, पणत्या प्रज्वलित करत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच शेतकरी कुटुंबांना भेटवस्तू म्हणून मिठाई आणि साड्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत गावकऱ्यांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
संकटातही माणुसकीचा प्रकाश!
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण करणे, त्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणे, हा ‘आनंदाची दिवाळी’ उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. झी २४ तासच्या या उपक्रमामुळे शिवणी गावातील शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद सामायिक करण्यात आला.
या कार्यक्रमाला झी २४ तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्यासह नितीन ढब्बू, गणेश मोरे, अभय किन्हीकर, अनुपमा खानविलकर, अभिषेक आदेप्पा, सचिन गुंड, सोमनाथ राऊत, लखन गुंड, धनाजी गुंड, प्रमोद गुंड आदी झी २४ तासच्या टीममधील सदस्य उपस्थित होते. तसेच गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
.jpeg)
No comments:
Post a Comment