महिलांच्या जीवनातील संघर्ष, विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन -सचिव डॉ. अनुपकुमार यादव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 30, 2026

महिलांच्या जीवनातील संघर्ष, विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन -सचिव डॉ. अनुपकुमार यादव

महिलांच्या जीवनातील संघर्ष, विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन -सचिव डॉ. अनुपकुमार यादव





मुंबई(कटूसत्य वृत्त):-  महिलांच्या जन्मापासून ते आयुष्यातील विविध टप्प्यांपर्यंतचा प्रवास, त्यांचे संघर्ष, कष्ट आणि सामाजिक वास्तव यांचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या प्रदर्शनातून महिलांच्या जीवनातील विविध पैलू छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला संरक्षणविषयक कायदे आणि मदतीसाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाईनची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येकासाठी हे प्रदर्शन महत्वपूर्ण असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित उजेडाच्या वाटेवर या छायाचित्र प्रदर्शनाला डॉ. अनुपकुमार यादव यांनी भेट दिली. यावेळी आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे उपस्थित होत्या. सर्व छायाचित्र संदेश भंडारी यांची कलाकृती आहे.

प्रदर्शनात शहरी तसेच ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांचे जीवन, त्यांच्या वाट्याला येणारे संघर्ष, सामाजिक परिस्थिती आणि विविध क्षेत्रांतील योगदान छायाचित्रांद्वारे मांडण्यात आले आहे. छायाचित्रांमधून व्यक्त होणाऱ्या भावना अधिक प्रभावी करण्यासाठी कल्पना दुधाळ, नारायण सुर्वे, अरुण काळे यांसारख्या कवींच्या कवितांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांच्या जीवनातील वेदना, संघर्ष आणि जिद्दीचे वास्तव अधिक संवेदनशीलतेने उलगडते.

महिलांना मदत मिळण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध हेल्पलाईन क्रमांकांची माहितीही प्रदर्शनात देण्यात आली आहे. यामध्ये चाइल्ड हेल्पलाइन १०९८, आपत्कालीन मदत ११२, महाराष्ट्र राज्य महिला आयोग १५५२०९, सखी वन स्टॉप सेंटर १८१, सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३०, ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७, मोफत कायदेशीर सल्ला १५१०० तसेच महिलांसाठी पोलीस मदत क्रमांक १०९१ यांचा समावेश आहे.

याशिवाय कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक अधिनियम, हुंडा प्रतिबंधक कायदा, मातृत्व लाभ कायदा, प्रसवपूर्व व प्रसवोत्तर निदान तंत्र कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, वैद्यकीय गर्भपात कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि मुस्लिम महिलांच्या हक्कांशी संबंधित कायद्यांची माहिती देण्यात आली आहे.

सध्याच्या ऑनलाइन युगात महिलांची विविध प्रकारे फसवणूक होण्याचे तसेच त्यांचे मानसिक आणि आर्थिक शोषण होण्याचे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सुरक्षितता, सायबर गुन्हे आणि त्यापासून बचाव करण्याबाबतही प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे.

महिलांच्या आयुष्यातील विविध अनुभव, संघर्ष आणि जगण्याची जिद्द यांचे दर्शन घडविणारे हे प्रदर्शन केवळ छायाचित्रांचे संकलन नसून महिलांचे हक्क, सुरक्षितता आणि समानतेचा संदेश देणारे प्रभावी माध्यम ठरत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages