ससून गोदीचा देशातील आदर्श मत्स्यबंदर म्हणून कायापालट करणार – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 29, 2026

ससून गोदीचा देशातील आदर्श मत्स्यबंदर म्हणून कायापालट करणार – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

 

ससून गोदीचा देशातील आदर्श मत्स्यबंदर म्हणून कायापालट करणार – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर




मुंबई(कटूसत्य वृत्त):-   ससून गोदी ही केवळ मच्छीमारीची गोदी नसून मुंबईची ओळख आणि येथील मच्छीमार कुटुंबांच्या भविष्याचा आधार आहे. या गोदीचे संरक्षण करून येथे काम करणाऱ्या मच्छीमारांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. ससून गोदीच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामांना गती देतानाच महिला मच्छीमारांच्या मुलांसाठी पाळणाघर, कामगारांसाठी उपाहारगृह आणि गोदामांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.

महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या वतीने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत ससून गोदी येथील महिला मच्छीमारांना सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमात ते बोलत होते.

ससून गोदी ही मुंबईची ओळख

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, गेटवे ऑफ इंडिया आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांच्याप्रमाणेच ससून गोदीचाही मुंबईच्या प्रमुख ओळखींमध्ये समावेश होतो. या गोदीशी मुंबईतील अनेक नागरिकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. येथील मच्छीमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या गोदीचा विकास आणि संरक्षण करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून, मच्छीमारांच्या न्याय्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेतात, असेही त्यांनी नमूद केले.

महिला मच्छीमारांच्या अडचणी सोडविण्यावर भर

ससून गोदी येथे महिला मच्छीमार पहाटेपासून कामाला सुरुवात करतात. अनेक महिलांना लहान मुलांना सांभाळण्यासाठी पर्याय नसल्याने मुलांनाही सोबत आणावे लागते. त्यामुळे या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करणे आवश्यक आहे. तसेच, महिला व पुरुष कामगारांसाठी विश्रांतीची सुविधा, उपाहारगृह आणि कॅफेटेरिया उपलब्ध करून द्यावा. गोदी परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छतेच्या सुविधांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. या सुविधांमुळे महिला मच्छीमारांसह सर्व कामगारांना मोठा दिलासा मिळेल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

ससून गोदीच्या आधुनिकीकरणाची कामे सुरू

ससून गोदीच्या आधुनिकीकरणांतर्गत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बर्फ भरण्याच्या प्रक्रियेचे स्वयंचलन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नवीन लिलावगृह तसेच कामगारांसाठी विश्रांतीच्या सुविधा विकसित करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. याशिवाय, गोदीतील गोदामांबाबतचा प्रलंबित प्रश्न सोडवून त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोदीतील पायाभूत सुविधांचा विकास झाल्यास मच्छीमारांचा व्यवसाय अधिक सुलभ होऊन त्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होईल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.

ससून गोदीच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले की, राज्यातील मच्छीमार समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घेतले आहेत. राज्य शासनाने पहिल्या १०० दिवसांत मच्छीमार व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. तसेच, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करून मच्छीमार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी १ हजार २४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

ससून गोदीतील मच्छीमारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून गोदीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल. महिला मच्छीमारांना वितरित करण्यात आलेल्या सुरक्षा किटमध्येही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यासाठी तमिळनाडू आणि इंडोनेशियातील तज्ज्ञांशी चर्चा सुरू असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन संशोधनाचा उपयोग करून महिलांचे काम अधिक सुरक्षित व सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या तीन वर्षांत ससून गोदीचा कायापालट करून देशातील आदर्श मत्स्यबंदर विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

 मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष

ससून गोदी ही अधिसूचित मत्स्यबंदर असून ती बंद होणार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. या गोदीचा विकास करून मच्छीमारांचे हित जपले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सुरक्षा किटमुळे महिलांच्या कामाला सुरक्षितता

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत महिला मच्छीमारांना वितरित करण्यात आलेल्या सुरक्षा किटमध्ये हातमोजे, सुरक्षा बूट, डोक्याचे संरक्षण करणारे आवरण, बोटांच्या संरक्षणासाठी कापसाचे संरक्षक साहित्य आणि मास्क यांचा समावेश आहे. कोळंबी सोलणे तसेच मत्स्यव्यवसायाशी संबंधित दैनंदिन कामे करताना महिलांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध व्हावीत, त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, महिलांना वितरित केलेल्या सुरक्षा किटमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा केली जात आहे. परदेशातील तसेच अन्य राज्यांतील आधुनिक पद्धतींचा अभ्यास करून महिलांना अधिक उपयुक्त सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. गोदीतील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षिततेसह विविध बाबींमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचाही विचार सुरू आहे. तसेच, गोदीत काम करणाऱ्या कामगारांना ओळखपत्रे देण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांनी प्रास्ताविक केले. आभारप्रदर्शन कृष्णात निकम यांनी केले.

यावेळी आमदार राजेश राठोड, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, भारतीय मत्स्य सर्वेक्षणाचे महासंचालक डॉ. श्रीनाथ के. आर., डॉ. विनोद, विविध मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, मच्छीमार महिला तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages