'जेन-झी ई-पोस्ट ऑफिस' संवाद-भेट उपक्रम उत्साहात संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो आणि भावसार व्हिजन - सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तरुण पिढीला डिजिटल सेवांशी जोडणारा 'जेन-झी ई-पोस्ट ऑफिस' (संवाद - भेट उपक्रम) नुकताच न्यू ई-पोस्ट ऑफिस, गुरुनानाक नगर, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हा उपक्रम 'संवाद जोडतो... पिढ्यांना भविष्याशी...' आणि ‘Digital Connect Brighter Future...' या संकल्पनेवर आधारित होता.
कार्यक्रमप्रसंगी प्रास्ताविक रोटे. श्रीकांत अंजुटगी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगून ई-पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख नव्या पिढीला करून देण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमात सौ. भाग्यश्री सोमवंशी यांनी जेन-झी पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांना व तरुण पिढीला देण्यात येणाऱ्या विविध ई-सेर्विसेसची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. पोस्ट ऑफिसच्या आधुनिक व डिजिटल सेवांची माहिती देताना त्यांनी ऑनलाइन माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांवर प्रकाश टाकला.
टपाल विभागामार्फत 'अतिजलद सेवा' सुरू करण्याची घोषणा:
सोलापूर विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर हेमंत खडकेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना टपाल विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध नावीन्यपूर्ण सेवा व कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. बदलत्या तंत्रज्ञानानुसार टपाल खाते कात टाकून अधिक गतीने सेवा देत असल्याचे त्यांनी सांगत, येत्या काळात 'ब्लिंकइट'च्या धर्तीवर बुक केलेले टपाल अवघ्या काही तासांत घरपोच पोहोचवणारी अतिजलद टपाल सेवा सुरू करण्यात येणार असल्याची विशेष आणि महत्त्वाची घोषणा केली.
बचत खात्यांचा शुभारंभ व सामाजिक बांधिलकी:
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून रोटरी क्लब आणि भावसार व्हिजन सोलापूर यांच्या पुढाकाराने टपाल कार्यालयात विशेष बचत खाती उघडण्यात आली. यामध्ये प्रवीण पतंगे आणि नितीन माळवदकर यांच्या मुलींचे तसेच मनोज क्षीरसागर यांच्या नातीचे 'सुकन्या समृद्धी योजना' खाते आणि त्यांच्या नातवाचे 'पीपीएफ' खाते उघडण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो आणि भावसार व्हिजन - सोलापूर यांच्या प्रायोजकत्वामधून समाजातील २० गरजू मुला-मुलींची सुकन्या समृद्धी योजना व पीपीएफ खाती मोफत उघडून देण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन यावेळी दोन्ही संस्थांच्या वतीने देण्यात आले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कार्यक्रमादरम्यान रोटे. महेश नक्का, योगीन गुर्जर आणि मनोज क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला जोडण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि टपाल विभागाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल आपले विचार मांडले.
तसेच या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रोचे अध्यक्ष रोटे. दिनेश काटकर, सेक्रेटरी रोटे. कल्लाप्पा गुरव, भावसार व्हिजन सोलापूरचे अध्यक्ष आशिष जवळकर, सेक्रेटरी हर्षल माळवदकर, खजिनदार निशिकांत पुकाळे, माजी अध्यक्ष विशाल खमीतकर, संचालक मनोज क्षीरसागर, रमेश माळवे व सुहास राशीनकर यांच्यासह सहाय्यक अधीक्षक संदीप घोडके, पोस्ट मास्तर विलास मस्तूद आणि इतर सर्व टपाल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जनसंपर्क निरीक्षक श्रीरंग रेगोटी यांनी केले. टपाल विभाग आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त पुढाकाराने पार पडलेल्या या उपक्रमाची सांगता उत्साही वातावरणात झाली.
.png)
No comments:
Post a Comment