गणेशोत्सवाला जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री ॲड. आशिष शेलार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 30, 2026

गणेशोत्सवाला जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री ॲड. आशिष शेलार

 

गणेशोत्सवाला जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री ॲड. आशिष शेलार


 


  • गणेशोत्सवाच्या आठवणी, कथा, छायाचित्रे आणि परंपरांचे ‘Bappa.org’ वर संकलन करण्याचे आवाहन

मुंबई(कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवाची व्याप्ती, त्याच्याशी जोडलेल्या परंपरा, संस्कार आणि पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या आठवणी जगासमोर मांडण्यासाठी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हे डिजिटल व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

‘बाप्पा डॉट ओआरजी’च्या माध्यमातून सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘बाप्पाचा कट्टा’ या ९० दिवसांच्या सांस्कृतिक उपक्रमाचा शुभारंभ मुंबईतील बँडस्टँड येथे करण्यात आला. यावेळी अभिनेते अमेय वाघ, चित्रपट निर्माते, लेखक व अभिनेते निपुण धर्माधिकारी, ‘बाप्पा डॉट ओआरजी’चे संस्थापक व ई-फ्लॅगचे संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्रीपाद अष्टेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरे करण्यास सुरुवात झाली. यंदा महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशातील विविध भागांत गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दुबईसह परदेशातही या उत्सवाचे कार्यक्रम होत असून, गणेशोत्सवाची व्याप्ती आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सीमांपलीकडे पोहोचत आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून कला, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय भावनेचे दर्शन घडवणारा उत्सव आहे. जात, धर्म आणि भाषेच्या पलीकडे जाऊन लोकांना जोडणाऱ्या या उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व जगासमोर मांडणे आवश्यक आहे. युनेस्कोने महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून मान्यता दिल्यानंतर आता गणेशोत्सवाला अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

यासाठी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या डिजिटल व्यासपीठावर नागरिकांनी गणेशोत्सवाशी संबंधित स्वतःच्या आठवणी, कथा, छायाचित्रे आणि परंपरांची माहिती नोंदवावी. या माध्यमातून गणेशोत्सवाशी असलेले भावनिक नाते, त्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रथा-परंपरांचे दस्तऐवजीकरण होईल. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल ‘कल्चरल प्रिझर्व्हर सर्टिफिकेट’ देण्यात येत आहे. नागरिकांनी क्यूआर कोड किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही मंत्री ॲड.शेलार यांनी केले.

‘बाप्पाचा कट्टा’च्या माध्यमातून उखाणे, म्हणी, ओव्या, पारंपरिक खेळ आणि विविध कलांच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. ऑनलाइन प्राथमिक निवडीनंतर कलाकारांना प्रत्यक्ष सादरीकरणाची संधी मिळणार असून, विजेत्यांना पारितोषिके व करंडक देण्यात येतील. या उपक्रमातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे जतन करण्याबरोबरच नव्या पिढीपर्यंत हा वारसा पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनी केवळ परंपरांविषयी बोलण्यापुरते मर्यादित न राहता त्या जतन करणाऱ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शेलार यांनी केले.

संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम – निपुण धर्माधिकारी

अभिनेते निपुण धर्माधिकारी म्हणाले की, ‘बाप्पा डॉट ओआरजी’च्या माध्यमातून संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम साधला जात आहे. बाप्पाच्या गोष्टी, रूढी आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरेल. नागरिकांनी अधिकाधिक नोंदणी करावी.

महाराष्ट्राची संस्कृती जगभर पोहोचवावी – अमेय वाघ

अभिनेते अमेय वाघ म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी सर्वांनी एकत्र येऊन साजरा करावा, या भावनेतून सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा रुजवली. धर्म आणि जात यांचे भेद विसरून एकत्र येण्याची ही भावना आजही जपली पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती केवळ राज्यापुरती किंवा देशापुरती मर्यादित न राहता जगभर पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.

९० दिवसांतून लोकपरंपरांना डिजिटल व्यासपीठ – श्रीपाद अष्टेकर

‘बाप्पा डॉट ओआरजी’चे संस्थापक श्रीपाद अष्टेकर यांनी ‘बाप्पाचा कट्टा’च्या माध्यमातून पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे सांगितले. पुण्यात सकाळी आणि मुंबईत संध्याकाळी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. नागरिकांनी व्हॉट्सॲपवर ‘बाप्पा डॉट ओआरजी’शी जोडून ‘बाप्पा’ असा संदेश पाठवावा आणि आपल्या कथा व आठवणी नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages