देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल - आ. सतेज पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- डॉ. श्रीकांत देवडीकर व डॉ. मानसी देवडीकर या दांपत्याने रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल टाकले असल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी, माळेवाडी-अकलूज येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक व सुसज्ज अशा देवडीकर मेडिकल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शितलदेवी मोहिते पाटील, प्रकाश पाटील,सुजय माने पाटील, डॉ. एम के इनामदार, डॉ.विवेक गुजर,वसुंधरा नंदकुमार देवडीकर, निशांत पाटील, डी. वाय.पाटील, डॉ.शीतल शहा, डॉ.अभिजीत राजेभोसले, उद्धव पाटील, डॉ.श्रीकांत देवडीकर, डॉ. मानसी देवडीकर यांच्यासह मोठ्या संख्येने माळेवाडी अकलूज परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.सतेज पाटील म्हणाले की, या मातीशी नात ठेवत,स्वर्गीय डॉ.नंदकुमार देवडीकर यांनी अकलूजमध्ये रुग्ण सेवा केली.तसेच डॉ. श्रीकांत देवडीकर व डॉ. मानसी देवडीकर यांनी रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल टाकले आहे. हे वैभव मोठ्या सचोटीने उभे केले आहे. डॉक्टरवर विश्वास ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असते.कारण प्रत्येक डॉक्टर अभ्यासपूर्ण हिस्ट्री बघत असतात.मी 90 सालापासून अकलूजला येत आहे.अकलूज म्हणले की मोहिते पाटील आले, हे महाराष्ट्राला माहीत आहे. 50 वर्षात मोहिते पाटील यांनी जे काम केले आहे ते पाचशे वर्षात विसरता येणार नाही असे ते म्हणाले.
मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीकांत देवडीकर म्हणाले की, आजचा दिवस भावनेचा आहे. कृतज्ञनेचा आहे आणि आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे.माझे वडील स्वर्गीय डॉ.नंदकुमार देवडीकर यांनी 1982 साली अकलूज परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून त्यांनी मेडिकल हबची पायाभरणी करून, विश्वासाची जाणीव सुरू केली होती.1982 साली विजयदादांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि आज चाळीस वर्षानंतरही विजयदादांच्या हस्तेच उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी रुग्णांच्या सेवेसाठी, हॉस्पिटलकडे येणारा अरुंद रस्ता वाढवण्याची मागणी, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे केली.
यावेळी प्रास्ताविक करताना डॉ मानसी देवडीकर म्हणाल्या, तुम्ही ठेवलेला विश्वास सात जन्मांची शिदोरी आहे. आजचा दिवस स्वप्नांची पूर्तता होण्याचा टप्पा आहे. आमच्यासाठी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी प्रकाश पाटील, डॉ. एम के इनामदार, यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार वसुंधरा देवडीकर यांनी मानले. प्रारंभी शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
चौकट
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले,
डायलिसिसच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत देवडीकर जिल्ह्यात चांगले काम करत आहेत. सर्वच डॉक्टर आपल्या आपल्या पद्धतीने अकलूजचे नाव चांगलं राहील असा प्रयत्न करत आहेत. डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी सुसज्ज हॉस्पिटल उभा केले आहे ते चांगल्या प्रकारे रुग्ण सेवा करतील, असे म्हणून त्यांनी नवीन हॉस्पिटलची उभारणी केल्या बद्दल शुभेच्छा दिल्या.तर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून,डॉ. एम के इनामदार यांनी अकलूज येथे डिजेवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे केली असता, खासदार मोहिते पाटील म्हणाले की, मोहिते पाटील यांनी कधीच डीजेचे समर्थन केले नाही.मी सुद्धा डीजेच्या विरोधात असून, अकलूज पोलिसांनीही यावर बंधने आणली आहेत असे ते म्हणाले.
चौकट:
माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, बायपास रोड झाल्यामुळे गावची बाजारपेठ कमी होईल असे लोकांना वाटत आहे .देशात हायवेवर वर्षाला 35 हजार अपघात होतात.सोलापूर पुणे हायवेवर वर्षाला साडे चार हजार अपघात होत असल्याचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी 20 बेडचे डायलिसिस सेंटर उभारल्यामुळे त्यांचे कौतुक मोहिते पाटील यांनी केले. तर 45 ते 60 वयोगटातील 80 टक्के लोक डायलिसिस करत आहेत याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तर आमदार सतेज पाटील यांच्याशी दोन पिढ्यांचे नाते असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आणि अकलूज मध्ये कॅन्सर हॉस्पिटलची आवश्यकता असल्याचे बोलून दाखवले.

No comments:
Post a Comment