मराठी भाषा महाविद्यालयात विविध उपक्रम व मराठी भाषा व साहित्याच्या वाटचालीवर व्याख्यान
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. विजय केसकर यांचे ‘मराठी भाषा व साहित्याची वाटचाल’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. जगदीशचंद्र मुळीक होते. व्यासपीठावर मराठी विभागप्रमुख डॉ. सुनीता सूर्यवंशी उपस्थित होत्या.
मराठी भाषेला समृद्ध साहित्यिक परंपरा
डॉ. विजय केसकर यांनी आपल्या व्याख्यानातून मराठी भाषेचा इतिहास, तिची प्राचीनता आणि साहित्याच्या विकासाचा प्रवास याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मराठी भाषा ही प्राचीन भाषा असून तिच्या इतिहासाचे पुरावे अडीच हजार वर्षांपूर्वीपर्यंत मागे जातात, असे त्यांनी सांगितले. महानुभाव साहित्य, मध्ययुगीन साहित्य आणि आधुनिक साहित्य अशा विविध टप्प्यांतून मराठी साहित्याची वाटचाल झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुकुंदराज यांच्या ‘विवेकसिंधू’ या ग्रंथाचा उल्लेख करत त्यांनी मराठीच्या लिखित साहित्यपरंपरेची माहिती दिली. चर्चात्मक पद्धतीने झालेल्या या व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य तथा भूगोल विभागप्रमुख डॉ. बी. टी. निकम, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. उत्तम सावंत, डॉ. डी. जी. शहाणे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय थोरात, प्रा. पुष्पा सस्ते, मराठी विभागातील डॉ. साळुबाई जाधव, ग्रंथपाल दिलीप शिंदे यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. सुनीता सूर्यवंशी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय वरिष्ठ लिपिक हनुमंत वाघमोडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. कमल कांबळे यांनी केले, तर आभार प्रा. सत्यभामा बडवणे यांनी मानले.
विविध स्पर्धांद्वारे मराठी भाषेचा जागर
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार दि. ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये रांगोळी स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा आणि ग्रंथालय भेट या उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम, साहित्याची आवड आणि भाषिक कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

No comments:
Post a Comment