मिशन सुधार अंतर्गत बंद केलेली ४,७७७ रेशन कार्डे पूर्ववत करून लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा सुरू करा- खा प्रणिती शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 28, 2026

मिशन सुधार अंतर्गत बंद केलेली ४,७७७ रेशन कार्डे पूर्ववत करून लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा सुरू करा- खा प्रणिती शिंदे

 मिशन सुधार अंतर्गत बंद केलेली ४,७७७ रेशन कार्डे पूर्ववत करून लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा सुरू करा- खा प्रणिती शिंदे





मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा तालुक्यात मिशन सुधार योजनेंतर्गत बंद करण्यात आलेली सुमारे ४,७७७ रेशन कार्डे पूर्ववत करून लाभार्थ्यांना नियमित धान्यपुरवठा सुरू करावा, तसेच रेशन कार्डधारकांच्या विविध समस्या तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. दामाजी चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रेशन कार्डधारक महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मिशन सुधार योजनेंतर्गत तालुक्यातील सुमारे ४,७७७ रेशन कार्डे बंद करण्यात आल्याने अनेक गरीब, गरजू व सर्वसामान्य कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मिळणाऱ्या अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच रेशन कार्ड उपलब्ध असूनही काही लाभार्थ्यांना नियमित धान्य मिळत नाही, तर रेशन मिळण्यास पात्र असलेल्या अनेक कुटुंबांना अद्याप रेशन कार्ड मिळालेले नाही. या गंभीर प्रश्नाबाबत खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

दामाजी चौकातून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सहभागी नागरिकांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत तहसील कार्यालय गाठले. यानंतर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून बंद करण्यात आलेली रेशन कार्डे तातडीने पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन पुरवठा निरीक्षक नवनाथ चव्हाण यांना देण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, यंदा दुष्काळाची तीव्रता असताना अशा परिस्थितीत रेशन कार्डधारकांचा धान्यपुरवठा बंद करणे अन्यायकारक आहे. सरकारला शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि रेशन कार्डधारकांच्या अडचणींची जाणीव नाही. सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन बंद केलेला धान्यपुरवठा तातडीने पूर्ववत करावा. अन्यथा जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संबंधित प्रकरणांची प्रत्यक्ष चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे म्हणाले की, तालुक्यात अद्याप जनावरांसाठी चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचा धान्यपुरवठा बंद करणे चुकीचे असून, शासनाने सध्याच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने दिलासा द्यावा.

राज्य सचिव रवीकरण कोळेकर म्हणाले कोणतेही शहानिशा न करता व कार्डधारकांना विश्वासात न घेता या सरकारने हे केलेले काम म्हणून हा निषेध आम्ही यांचा करत आहोत.

रेशन कार्डे पूर्ववत करून नियमित धान्यपुरवठा सुरू करणे, पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देणे आणि रेशन कार्डधारकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करणे, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. जोपर्यंत अन्यायग्रस्त रेशन कार्डधारकांना न्याय मिळत नाही आणि त्यांचा धान्यपुरवठ्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार मंगळवेढा काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲड. रविकिरण कोळेकर, मंगळवेढा शहराध्यक्ष ॲड. राहुल घुले, ॲड. दत्तात्रय खडतरे, नाथा ऐवळे, अर्जुन पाटील, सत्तार इनामदार, ज्ञानेश्वर सोरडीकर, महिला तालुकाध्यक्ष आयेशा शेख, अभिमन्यू तात्या बेद्रे, बजरंग चौगुले, दामाजी सलगर, आबा पाटील, अण्णासाहेब शिरसागर, शिवदास पुजारी, सुरेश चव्हाण, महादेव साखरे यांच्यासह तालुक्यातील रेशन कार्डधारक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages