सोलापूर महापालिकेतील सर्व आऊटसोर्सिंग एजन्सींची होणार चौकशी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील गणेशोत्सव काळातील कचरा संकलन आणि स्वच्छता कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या तक्रारीची सोलापूर महानगरपालिकेने गंभीर दखल घेतली आहे. स्वीकृत नगरसेवक अक्षय ज्ञानेश्वर अंजीखाने यांनी केलेल्या लेखी तक्रारीनंतर, संबंधित कंत्राटदाराच्या कामाची सखोल चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या मान्यतेने पाच सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
या प्रकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली असून, आता केवळ कचरा संकलन व स्वच्छता कंत्राटापुरती चौकशी मर्यादित राहणार नाही. सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व आऊटसोर्सिंग एजन्सींनी मागील तीन वर्षांत केलेल्या कामांचे सखोल लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यामुळे विविध कंत्राटांमधील संभाव्य अनियमितता उघड होण्याची शक्यता आहे.
नगरसेवक अक्षय अंजीखाने यांनी आपल्या तक्रारीत संबंधित कंत्राटदारावर गंभीर आरोप केले होते. गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ आणि वाहने उपलब्ध न करून देता महापालिकेची फसवणूक करण्यात आली तसेच लाखो रुपयांचा कथित अपहार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.
याशिवाय, कंत्राटी कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी (PF) आणि कर्मचारी राज्य विमा (ESI) यांचे लाभ दिले जात नसल्याचे, तसेच वेतन वेळेवर अदा केले जात नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या कथित प्रकारांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.
चौकशीदरम्यान कंत्राटदाराच्या कामकाजाची पडताळणी करण्यासाठी GPS प्रणालीतील नोंदी आणि बायोमेट्रिक उपस्थितीच्या पुराव्यांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. प्रत्यक्षात किती कर्मचारी कामावर उपस्थित होते, किती वाहने वापरण्यात आली आणि कंत्राटानुसार काम झाले का, याची पडताळणी या प्रक्रियेत महत्त्वाची ठरणार आहे.
या प्रकरणात दोषी आढळणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने उपायुक्त सोनाली यादव यांनी चौकशी समिती गठीत करण्याचे कार्यालयीन आदेश जारी केले आहेत.
या चौकशीमुळे महापालिकेतील आऊटसोर्सिंग कंत्राटांच्या कामकाजावर अधिक काटेकोर नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आता चौकशी समितीच्या अहवालात कोणत्या बाबी समोर येतात आणि संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment