विहाळ ग्रामपंचायतीची साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई
करमाळा (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील विहाळ ग्रामपंचायतीने मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी साखर कारखान्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. विहाळ गावच्या हद्दीतील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. युनिट क्रमांक २ (शिवगिरी ॲग्रो शुगर वर्क्स प्रा. लि.) या साखर कारखान्याकडे ग्रामपंचायतीचा तब्बल १४ लाख ९३ हजार ५५९ रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी ग्रामपंचायतीने कारखाना प्रशासनाला अंतिम जप्तीची नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत संपूर्ण थकबाकी न भरल्यास कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करून वसुली करण्यात येईल, असा इशारा या नोटिशीत देण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार, साखर कारखान्याच्या मिळकत क्रमांक ६८० अर्थात फॅक्टरी परिसरावरील १३ लाख ५० हजार ६३४ रुपये, तर कामगार वसाहतीच्या मिळकत क्रमांक ६८१ वरील १ लाख ४२ हजार ९२५ रुपये असा एकूण १४ लाख ९३ हजार ५५९ रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांतील ही थकबाकी असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे.
थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी ग्रामपंचायतीने यापूर्वीही कारखाना प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. ३० जून २०२६ रोजी कर मागणी बिले बजावण्यात आली होती. त्यानंतर ४ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १२९ (२) अन्वये मागणी हुकूमनामा अर्थात रिट बजावण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही थकीत कराचा भरणा न झाल्याने ग्रामपंचायतीने पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणी ग्रामपंचायतीने ठराव क्रमांक ३७ पारित केला असून, पंचायत समिती करमाळ्याचे गटविकास अधिकारी यांची पूर्वपरवानगीही घेतली आहे. यासाठी कार्यालयीन पत्र क्रमांक ६४७/२०२६ अन्वये परवानगी मिळाल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली आहे. त्यानंतर २१ ऑक्टोबर २०२६ रोजी कारखाना प्रशासनाला अंतिम जप्तीची नोटीस बजावण्यात आली. नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत संपूर्ण थकबाकी जमा न केल्यास नियमानुसार जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करून कराची वसुली करण्याची कारवाई केली जाईल, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत विहाळच्या सरपंच सौ. पूजा मोहन मरकड यांनी सांगितले की, गावातील विकासकामांसाठी ग्रामपंचायतीला मिळणारा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. मोठ्या उद्योगांकडून वेळेत कर भरला गेला नाही, तर त्याचा परिणाम गावाच्या विकासकामांवर होऊ शकतो. त्यामुळे नियमानुसार आणि वरिष्ठांच्या परवानगीने ही कारवाई करण्यात आली आहे. गावकऱ्यांच्या हितासाठी ग्रामपंचायतीने कठोर भूमिका घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईची माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर, तहसीलदार करमाळा आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती करमाळा यांना पाठविण्यात आली आहे. आता ग्रामपंचायतीने बजावलेल्या अंतिम नोटिशीनंतर कारखाना प्रशासन थकीत मालमत्ता कराचा भरणा करणार का, की पुढील जप्तीच्या कारवाईला सामोरे जाणार, याकडे विहाळ ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment