महाराष्ट्राची लोकसंस्कृती वर्षभर जपण्यासाठी ‘बाप्पाचा कट्टा’ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 29, 2026

महाराष्ट्राची लोकसंस्कृती वर्षभर जपण्यासाठी ‘बाप्पाचा कट्टा’

महाराष्ट्राची लोकसंस्कृती वर्षभर जपण्यासाठी ‘बाप्पाचा कट्टा’



  • -पुण्यात उद्यापासून ९० दिवसांचा सांस्कृतिक उपक्रम
  • मित्रमंडळींना कलागुण सादर करण्याची संधी

मुंबई(कटूसत्य वृत्त):-   महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि कलांचा वारसा केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न राहता वर्षभर जनमानसात जिवंत राहावा, या उद्देशाने ‘bappa.org’ या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात ‘बाप्पाचा कट्टा’ हा ९० दिवसांचा सांस्कृतिक उपक्रम मुंबई आणि पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या या उपक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि बाप्पा डॉट ऑर्गचे श्रीपाद आष्टेकर यांच्या सहभागातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याच्या संकल्पनेला पुढे नेत या उपक्रमाद्वारे सर्वसामान्य कुटुंबे, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे. उखाणे, मंगळागौरीचे खेळ, भोंडला, पोवाडा, लोककला, म्हणी, अंताक्षरी तसेच पारंपरिक आणि आधुनिक कलांच्या संगमातून हा सांस्कृतिक कट्टा रंगणार आहे.

मुंबईतील वांद्रे बँडस्टँड आणि पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता (एफ.सी. रोड) येथे या उपक्रमाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. दर रविवारी सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी जोड्यांना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी संबंधित कलाप्रकार तीन मिनिटांत सादर करता येतील. कुटुंबीय, मित्र, सहकारी, विद्यार्थी-शिक्षक किंवा एकत्र राहणाऱ्या व्यक्तींच्या जोड्यांना सहभागी होता येणार असून, जोडीतील किमान एका सदस्याचे वय १८ ते ३५ वर्षे असणे आवश्यक आहे. भारतीय भाषांमधून सादरीकरण करता येईल; मात्र त्यात मराठीतील किमान एक ओळ असणे आवश्यक आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. इच्छुकांनी ‘bappa.org’च्या +९१ ९१३६१ ७२६८१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर ३० सेकंदांचा ऑडिशन व्हिडिओ पाठवावा. प्रत्येक शहरातून दर आठवड्याला १६ जोड्यांची निवड केली जाणार आहे. विजेत्यांची निवड व्हॉट्सॲपद्वारे होणाऱ्या सार्वजनिक मतदानाच्या आधारे करण्यात येईल. प्रत्येक मोबाईल क्रमांकावरून आठवड्यातून एकदाच मतदान करता येईल.

प्रत्येक शहरात साप्ताहिक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येतील. तसेच सुवर्ण, रौप्य आणि कांस्य स्वरूपातील ‘मोदक करंडक’ प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर केले जाईल. दर आठवड्याला सेलिब्रिटी सह-यजमान सहभागी होऊन कलाकारांना प्रोत्साहन देतील.

उद्या उद्घाटन सोहळे

गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे बँडस्टँड येथे सायंकाळी ७ वाजता, तर पुण्यातील एफ.सी. रोड येथे सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे. या उपक्रमातून महाराष्ट्राच्या लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणाऱ्या कुटुंबांचा गौरव करण्यात येणार आहे.

रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ पासून २४ जानेवारी २०२७ पर्यंत दर रविवारी रात्री ७ ते १० या वेळेत कार्यक्रम होणार आहेत. भावंडांमधील धमाल, उखाणे, मंगळागौर व भोंडला, बोलीभाषेतील स्पर्धा, म्हणींवर आधारित खेळ, लोककला, हिप-हॉप, पोवाडा आणि रॅप, जुन्या नाटकांतील प्रसंग तसेच तिळगुळाचे उखाणे अशा विविध संकल्पनांवर आधारित सादरीकरणे यावेळी पाहायला मिळतील.

या उपक्रमाचा भव्य महाअंतिम सोहळा प्रजासत्ताक दिनी, मंगळवार, २६ जानेवारी २०२७ रोजी मुंबईतील वांद्रे बँडस्टँड येथे होणार असून, पुण्यातही त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ‘कलाधिपती करंडक’ प्रदान करण्यात येणार असून, चंद्रोदयाच्या वेळी ‘६४ कलांचा मोदक’ सादर केला जाणार आहे.

महाराष्ट्राची लोककला आणि सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना या वारशाच्या जतनात सक्रिय सहभागी करून घेणे, हा ‘बाप्पा चा कट्टा’चा प्रमुख उद्देश आहे. मुंबई आणि पुणे येथील नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्यांना उपस्थित राहून सहभागी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मंत्री ॲड.शेलार आणि अष्टेकर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages