जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाचे क्रीडा स्पर्धांत घवघवीत यश
कोंडी (कटूसत्य वृत्त):- क्रीडा व युवक संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच विजयसिंह मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोंडी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सॉफ्ट टेनिस, ॲथलेटिक्स आणि तलवारबाजी या क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली असून, एकूण १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सोलापूर येथील हरीभाई देवकरण प्रशालेत पार पडलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात समृद्धी धर्मराज नन्नवरे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात दर्शना अतुल देशमुख हिने प्रथम क्रमांक पटकावला. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात श्रद्धा धर्मराज नन्नवरे हिने द्वितीय, तर अक्षरा दिनकर साठे हिने तृतीय क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात आदर्श ज्योतिबा गुंड याने प्रथम, युद्धाजीत दत्तात्रय भोसले याने द्वितीय, तर अथर्व रोहित चौगुले याने चौथा क्रमांक मिळवून आपल्या कौशल्याची छाप पाडली.
पंढरपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अथर्व संतोष गायकवाड याने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, तर २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. आकांक्षा अनिल शिंदे हिने गोळाफेक प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला, तर कार्तिक नागनाथ दळवे याने भालाफेक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. या कामगिरीमुळे आकांक्षा शिंदे आणि कार्तिक दळवे यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तलवारबाजी स्पर्धेतही विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवले. १७ वर्षांखालील गटात सफा एजाज शेख हिने ईपी प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला, तर १९ वर्षांखालील गटात शगुन शिवाप्पा राठोड हिने फॉईल प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री गणेश नीळ, प्राचार्य सौ. सुषमा नीळ, मुख्याध्यापिका अर्चना औरादे आणि प्रतिक्षा खुणे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून आगामी विभागीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे कोंडी परिसरातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
.png)
No comments:
Post a Comment