महावितरणच्या योजनांची विद्यार्थ्यांना माहिती व योजने विषयी चर्चासत्र
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, नातेपुते येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) यांच्या सहकार्याने ‘वीज ग्राहकांसाठी विविध योजना’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नातेपुते विभागीय महावितरणचे कार्यकारी अभियंता खिलारे यांनी वीज ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजनांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.महावितरणचे कनिष्ठ अभियंता निकम यांनी ऊर्जा बचतीचे महत्त्व स्पष्ट करताना वीज वापरताना कोणत्या उपाययोजना कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात तसेच विद्युत सुरक्षेबाबत कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवानराव साळुंखे यांनी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी ऊर्जा बचतीबाबत जागरूक राहून समाजामध्येही ऊर्जा बचतीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जगदीशचंद्र मुळीक व प्रा. उत्तम सावंत यांनी केले.
कार्यक्रमास इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर अभिजीत काळे, प्रा. डॉ. कमल कांबळे, प्रा. अमर वाघमोडे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सतीश पाटील, प्रा. सौरभ सावंत, प्रा. पंकज कोडलकर, कार्यालयीन कर्मचारी एच. टी. वाघमोडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment