विशेष मोहीम 6.0 अंतर्गत सोलापूर विभागातील 58 स्थानकांवर ‘रेल जनसंवाद’ उपक्रमाद्वारे प्रवाशांशी थेट संवाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 24, 2026

विशेष मोहीम 6.0 अंतर्गत सोलापूर विभागातील 58 स्थानकांवर ‘रेल जनसंवाद’ उपक्रमाद्वारे प्रवाशांशी थेट संवाद

 विशेष मोहीम 6.0 अंतर्गत सोलापूर विभागातील 58 स्थानकांवर ‘रेल जनसंवाद’ उपक्रमाद्वारे प्रवाशांशी थेट संवाद


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर विभाग, मध्य रेल्वे यांच्यावतीने दिनांक 22 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष मोहीम 6.0 अंतर्गत विभागातील 58 रेल्वे स्थानकांवर ‘रेल जनसंवाद’ उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांशी थेट संवाद साधणे, रेल्वे सेवांबाबत त्यांच्या सूचना, अभिप्राय आणि तक्रारी जाणून घेणे तसेच प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी लोकसहभाग वाढविणे हा होता.

भारतीय रेल्वेच्या देशभरातील 7,000 हून अधिक स्थानकांवर हा उपक्रम एकाच वेळी आयोजित करण्यात आला. प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून सेवा देण्याची आणि सहभागी प्रशासनाला प्रोत्साहन देण्याची भारतीय रेल्वेची बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित झाली.

सोलापूर विभागात या उपक्रमाचे नेतृत्व विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांनी पंढरपूर स्थानकाहून केले. यावेळी पंढरपूर रेल्वे स्थानक येथे शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी मौल्यवान सूचना आणि अभिप्राय दिले. या संवादातुन तरुण पिढीचा सहभाग हा रेल्वे सेवांच्या सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले.

सोलापूर स्थानकावर अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या सूचना, अभिप्राय आणि प्रवासी सुविधांशी संबंधित समस्या जाणून घेतल्या. विभागातील इतर स्थानकांवरही रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवासी आणि संबंधित घटकांशी संवाद साधून त्यांना आपली मते मांडण्याची संधी दिली.

प्रवाशांकडून प्राप्त झालेल्या सूचनांवर आणि तक्रारींवर नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी अभिप्राय फॉर्म भरून घेण्यात आले. प्राप्त मुद्द्यांचे पुढील तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले:

* अल्पकालीन: तातडीने किंवा कमी कालावधीत सोडवता येणाऱ्या समस्या.
* मध्यमकालीन: संबंधित विभागांमधील समन्वय, नियोजन आणि अंमलबजावणी आवश्यक असलेले विषय.
* दीर्घकालीन: धोरणात्मक बदल, व्यापक नियोजन किंवा वरिष्ठ स्तरावरील मंजुरी आवश्यक असलेले विषय.

या पद्धतशीर प्रक्रियेमुळे प्रवाशांच्या समस्यांना प्राधान्य देणे, संबंधित विभागांमार्फत योग्य कार्यवाही करणे आणि तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यास मदत होणार आहे. तसेच रेल्वे सेवा आणि प्रवासी सुविधांच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यास चालना मिळणार आहे.

‘रेल जनसंवाद’ हा उपक्रम विशेष मोहीम 6.0 च्या उद्दिष्टांनाही पूरक ठरला. या मोहिमेत जागेचे प्रभावी व्यवस्थापन, भंगार व ई-कचऱ्याची विल्हेवाट, नागरिकांचा सहभाग आणि त्यानंतर स्वच्छता उपक्रम राबविणे यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छ, सुव्यवस्थित आणि प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर रेल्वे परिसर निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

सोलापूर विभागातील ‘रेल जनसंवाद’ उपक्रमात सहभागी झालेली 58 स्थानके पुढीलप्रमाणे आहेत:

पंढरपूर, सोलापूर, कलबुरगि, अक्कलकोट रोड, दुधनी, गाणगापूर रोड, शाहाबाद, वाडी, कुर्डुवाडी, जेऊर, धाराशिव, लातूर, बार्शी टाउन, सांगोला, हरंगुळ, होटगी, केम, मोहोळ, मरतूर, टिकेकरवाडी, सलगरे, कवठे महांकाळ, मोडनिंब, माढा, कुलाली, बोरोटी, ताज सुलतानपूर, मालीकपेठ, वाशिंबे, अनगर, औसा रोड, वाकाव, तिलाटी, भाळवणी, हिरेनंदुरू, वडशिंगे, बाळे, शेंद्री, भिगवण, जिंती रोड, मुंढेवाडी, पाकणी, केत्तूर, बबलाद, सावळगी, गौडगाव, मलठाण, येडशी, पांगरी, ढालगाव, पोफळज, अरग, ढवळस, जत रोड, ढोकी, बोरीबेल, हुन्सीहडगील आणि नागणसूर.

‘रेल जनसंवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून सोलापूर विभागाने प्रवाशांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांच्या समस्यांवर नियोजनबद्ध कार्यवाही करणे आणि प्राप्त अभिप्रायाच्या आधारे रेल्वे सेवा व प्रवासी सुविधांचा दर्जा उंचावणे याप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages