याचिका मागे घे, सभेला हजर राहू नको; अन्यथा जिवंत ठेवणार नाही. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 24, 2026

याचिका मागे घे, सभेला हजर राहू नको; अन्यथा जिवंत ठेवणार नाही.

याचिका मागे घे, सभेला हजर राहू नको; अन्यथा जिवंत ठेवणार नाही.

भीमा साखर कारखाना मल्टीस्टेट करण्याविरोधातील याचिकाकर्त्यास व्हॉट्सॲपवर धमकी; मोहोळ पोलिसांत तक्रार




मोहोळ (कटूसत्य वृत्त):-  भीमा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील समाधान पांडुरंग शेळके यांना व्हॉट्सॲप संदेशाद्वारे धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याचिका मागे घ्यावी आणि कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला हजर राहू नये, अन्यथा जिवंत ठेवणार नाही, अशा आशयाचा धमकीचा संदेश संबंधितांना पाठविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
समाधान शेळके यांनी भीमा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी टाकळी सिकंदर येथे भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शेळके यांच्या व्हॉट्सॲपवर एका मोबाईल क्रमांकावरून धमकीचा संदेश पाठविण्यात आल्याचे त्यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. कारखान्याबाबत दाखल केलेली याचिका मागे घेण्यास तसेच आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू नये, अन्यथा जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित मोबाईल क्रमांकावरून धमकीचा संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. धमकीचा संदेश, संबंधित मोबाईल क्रमांक आणि या प्रकरणामागील नेमका प्रकार याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नाळे करीत आहेत.

 दरम्यान, आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्याला धमकीचा संदेश आल्याने या प्रकरणाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages