विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्याचे संगोपनही गरजेचे – मंत्री आदिती तटकरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 1, 2026

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्याचे संगोपनही गरजेचे – मंत्री आदिती तटकरे

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्याचे संगोपनही गरजेचे – मंत्री आदिती तटकरे




मुंबई(कटूसत्य वृत्त):- बदलत्या काळातील वाढती स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या मानसिक आरोग्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे. यश आणि अपयश हे आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

अंजुमन-ए-इस्लाम संचलित सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) इंडिया आणि यामा पटेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक उपक्रमात गरजू पालकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.

यावेळी अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. झहीर आय. काझी, सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या अमीना काझी, अंजुमन-ए-इस्लामचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष हाजी हसीन आघाडी, यामा पटेल फाउंडेशन तसेच डब्ल्यूएमओ मुंबईचे शहर अध्यक्ष हाजी मुदस्सर पटेल, हाजी इम्तियाज मोटरवाला, नसीन मकलाई, हुरिया पटेल आणि मुमताज परफ्यूमवाला यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, अंजुमन-ए-इस्लाम ही संस्था शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करत आहे. बदलत्या काळानुसार आणि प्रचंड स्पर्धेच्या युगात येणाऱ्या पिढीला योग्य शिक्षण देणे हे सर्वांत महत्वाचे काम आहे. गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बळकट करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षण व मूलभूत सुविधांसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.

पद्मश्री डॉ. झहीर आय. काझी यांनी संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती दिली. अंजुमन-ए-इस्लामची स्थापना १५२ वर्षांपूर्वी झाली असून स्वातंत्र्यसंग्रामातही संस्थेने योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या संदेशासोबत अंजुमन-ए-इस्लाम ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि बेटी बसाओ’ या संकल्पनेवर काम करत आहे. अनाथ मुलींचे शिक्षण, विवाह आणि पुनर्वसनाची जबाबदारीदेखील संस्था पार पाडत असल्याची माहिती त्यांनी दिली.

ईद-ए-मिलादच्या पर्वानिमित्त आयोजित या उपक्रमाला लाभार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. मानवतेची सेवा आणि गरजूंच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages