कुमठे कनिष्ठ महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या संधींवर मार्गदर्शन
कुमठे (कटूसत्य वृत्त) : कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात यंदाचा गणेशोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत असून, गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नाविन्यपूर्ण शिक्षण’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा. ए. ए. सोनकांबळे यांनी गुंफले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या विविध संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सहकार तपस्वी कै. ब्रह्मदेवदादा माने यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रा. सोनकांबळे यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करून ज्ञान संपादन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
‘ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे’, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता, विज्ञान, गणित, भाषा आणि इंग्रजी या विषयांवर प्रभुत्व मिळवावे, तसेच नियमितपणे वर्तमानपत्रांचे वाचन करावे, असे आवाहन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना सामान्य ज्ञानासोबतच चालू घडामोडींची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे विश्वस्त व नगरसेवक जयकुमार माने यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची व्याख्यानमाला सुरू करून त्यांना ज्ञान आणि करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असे मत प्रा. सोनकांबळे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अंबादास रेडे होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबतच स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. संजय जाधव, प्रा. हणमंत शिंदे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विजय वाळके, प्रा. राजीव निकम, प्रा. बंडोपंत बाबर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. मनोज साठे यांनी केले. व्याख्यात्यांचा परिचय प्रा. विनोद थोरात यांनी करून दिला, तर आभार प्रा. संजय जाधव यांनी मानले.

No comments:
Post a Comment