दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत द्या- डॉ.ऍड.संदीप ताजने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 21, 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत द्या- डॉ.ऍड.संदीप ताजने

 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत द्या- डॉ.ऍड.संदीप ताजने

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री-आमदार-खासदारांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करावी



नागपूर(कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात होरपळत असताना सरकारने आता कागदी घोषणा आणि बैठकींच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ.ऍड.संदीप ताजने यांनी केली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांनी वातानुकूलित कार्यालयांत बसून आढावा घेण्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावे आणि पिकांचे झालेले नुकसान स्वतः पाहावे. शेतकऱ्यांची हिंमत दुष्काळामुळे खचली असली तरी त्यांचा कणा अजूनही ताठ आहे. या स्वाभिमानी बळीराजाला सरकारने आश्वासन नव्हे, तर ठोस आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन डॉ.ऍड.ताजने यांनी केले.

“बळीराजाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात तथागत गौतम बुद्ध आणि गणपती बाप्पा सत्ताधाऱ्यांना सदसद्विवेकबुद्धी देवो,” अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

मोजके पालकमंत्री वगळता अनेक जिल्ह्यांना केवळ ‘झेंडा पालक मंत्री’ मिळाले असून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या झेंडावंदनापुरतेच त्यांचे दर्शन होते, असा आरोप डॉ.अॅड.ताजने यांनी केला. त्यांचे स्वीय सहायक केवळ महिन्याकाठी वसुली करण्यासाठी येतात, अशी सर्वसामान्यांची ओरड आहे.मंत्र्यांच्या कार्यालयीन यंत्रणेकडून वसुलीचे आरोप होत असताना राज्यातील भ्रष्टाचार आणि अवैध धंद्यांवर गृहमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

लाडकी बहीण आणि इतर योजनांसाठी निधी उपलब्ध होतो, मग अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी निधीची कमतरता का? असा सवाल करत दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने आठवड्याभरात ठोस मदत जाहीर करावी, अशी मागणी डॉ.ऍड.ताजने यांनी केली.

राज्यातील परिस्थितीची तीव्रता शासकीय आकडेवारीतूनही स्पष्ट होत आहे. राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ३६ पैकी २० जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्य तूट नोंदली गेली आहे. राज्याला सरासरी ८६६.४ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ ६३२.५ मिमी पाऊस मिळाला असून, ही तूट सुमारे २७ टक्के आहे. अनेक भागांत सलग ३० दिवसांहून अधिक काळ पाऊस न झाल्याने खरीप पिकांवर परिणाम झाला आहे, असे डॉ.ऍड.ताजने यांनी स्पष्ट केले.

विदर्भाची परिस्थितीही अत्यंत चिंताजनक आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भात अपेक्षित २९७.१ मिमीच्या तुलनेत केवळ १२५.५ मिमी पाऊस झाला. म्हणजेच तब्बल ५८ टक्के पर्जन्यतूट झाली. ३ सप्टेंबरला विदर्भातील धरणांमध्ये सुमारे ६२ टक्के पाणीसाठा होता. नागपूर आणि अमरावती विभागातील साठाही केवळ ६३ टक्क्यांच्या आसपास होता. संत्रा, सोयाबीन, उडीद, मूग आणि काही भागातील कापूस पिकांवर याचा परिणाम झाल्याचे अहवाल आहेत.

मराठवाड्याची परिस्थिती देखील चिंताजनक आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान या विभागात सरासरी ६७९.५ मिमीच्या तुलनेत ४२४.५ मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या केवळ ६९.२ टक्के आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्राथमिक आकलनानुसार, आठही जिल्ह्यांतील उभ्या पिकांपैकी किमान २५ टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, मका आणि तूर या पिकांवरही परिणाम झाला असल्याचे डॉ.ऍड.ताजने म्हणाले.

परतीच्या पावसाची शक्यता कमी होत असल्याने उपलब्ध विहिरी, तलाव आणि अन्य जलस्रोतांचे पाणी उन्हाळ्यासाठी राखून ठेवण्याचे तातडीचे नियोजन करावे; अन्यथा भविष्यात पिण्याच्या पाण्याचेही गंभीर संकट निर्माण होऊ शकते, असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages