मंगळवेढा तालुक्यातील मुढवी येथे वाळुमाफियांकडून आदिवासी महादेव कोळी समाजाच्या कुटूंबावर प्राणघातक हल्ला; महर्षी वाल्मिकी संघ आक्रमक
पंंढरपूर (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा तालुक्यातील मुढवी या गावात वाळु माफियांनी आदिवासी महादेव कोळी समाजाच्या एका कुटूंबावर प्राणघातक हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली असुन मारहाण झालेले कुटूंब पंढरपुरात येऊन महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांना भेटले.
यावेळी समजलेल्या माहिती नुसार नरहरी आगतराव कांबळे (वय 54), नागेश नरहरी कांबळे (वय 27), प्रदीप नरहरी कांबळे (वय 34) सर्व रा. मुढवी, ता. मंगळवेढा यांना गावातील अवैध वाळू उपसा करणा-या वाळु माफियांनी शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास लोखंडी रॉड, दगड, काठ्यांनी बेदम मारहाण केली यानंतर पोलीस स्टेशन ला जाताना चौकात अडवून त्यांच्या घरच्यांनाही मारहाण केली. यावेळी घरातील महिला, आठ महिन्याचं बाळ, एक चार वर्षाची मुलगी व दुसरी सात वर्षाची मुलगी सोबत होती. तरीही वाळुमाफीयांनी या कुटूंबावरच भ्याड हल्ला केल्याने आम्हा आदिवासी महादेव कोळी समाजाच्या भावना तीव्र झाल्या असुन समाजात संतापाची लाट उसळली आहे.
मारहाण झालेल्या वरील व्यक्ती मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेल्यानंतर पोलीसांनी याची दखल न घेता सोलापूर सिव्हील ला पाठवले व तिथं येऊन जबाब घेतो म्हणाले पण पोलीस तिकडे फिरकलेच नाहीत, याउलट ज्यांना मारहाण झालीय त्यांच्या वरच खोटे गुन्हे दाखल केल्याचं समजतंय. यानंतर हे बांधव पंढरपुरात आमच्याकडे गा-हाणं मांडण्यासाठी आलेत. आता तरी पोलीसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन यांची तक्रार दाखल करून या गुन्ह्यातील गुन्हेगारांना अटक करून कडक कारवाई करावी, या गुन्हेगारांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात याआधीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. संघटीत गुन्हेगारी करणा-या या टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करावेत ही आमची मागणी असुन जर पोलीसांनी तातडीने याबाबत कारवाई केली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू. असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलाय.



No comments:
Post a Comment