मानसिक आरोग्य व ताणतणाव व्यवस्थापनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बार्शी (कटूसत्य वृत्त):- कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी येथे 22 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने ‘मानसिक आरोग्य व ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी येथील डाएटिशियन व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनुष्का शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मानसिक व शारीरिक आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी, दैनंदिन जीवनातील ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे, व्यसनांपासून दूर कसे राहावे, तसेच नैराश्य (Depression) व चिंता (Anxiety) यांसारख्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अभ्यासातील एकाग्रता वाढविण्यासाठी आवश्यक जीवनशैली, आहार, झोप, व्यायाम आणि सकारात्मक विचारसरणीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
या मार्गदर्शनपर कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून तज्ज्ञांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एस. कुलकर्णी, प्रा. गणेश जाधव, प्रा. ए. आर. आदलिंगे आणि डॉ. महेश गुरव यांनी विशेष प्रयत्न केले.

No comments:
Post a Comment