जड वाहतुकीने गोदूताई वसाहतीचा जीव घेतला! नागरिकांचा रस्ता रोको; प्रशासनाला खडसावले
कुंभारी - सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तालुका दक्षिण सोलापूरमधील मौजे कुंभारी येथील कॉ. गोदूताई परुळेकर वसाहतीतून सुरू असलेल्या जड वाहतुकीविरोधात संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली असून, नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या नागरी वसाहतीतील रस्त्यांवरून दिवसभर मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्ते खड्डेमय व धोकादायक झाले आहेत. शाळेत जाणारी मुले, बाजारपेठेत जाणारे नागरिक, विडी कारखान्यांमध्ये कामासाठी जाणारे कामगार तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
जड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी रात्री साडे आठ वाजता आंदोलनात सहभागी होत जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचा निषेध केला आणि जड वाहतूक तातडीने बंद करण्याची मागणी केली.
“नागरिकांच्या जीवाशी खेळणारी वाहतूक आम्ही सहन करणार नाही; प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा,” अशी संतप्त भूमिका आंदोलकांनी मांडली.
रस्ता रोकोमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
जड वाहतूक बंद करून सुरक्षित रस्ते उपलब्ध करून द्या, अन्यथा “खळखट्याक” आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला.
नागरिकांच्या जीविताशी संबंधित या गंभीर प्रश्नावर प्रशासन आता कोणती भूमिका घेते कारवाई करते ? याकडे संपूर्ण वसाहतीचे लक्ष लागले आहे.
यावेळी ॲड अनिल वासम,विजय हरसुरे,नागनाथ जल्ला ,वसीम मुल्ला, दिनेश बडगु,नरेश गुल्लापली,बालाजी तुम्मा,ॲड.शाम आडम, नागेश तुम्मा, चंटी बिटला, मल्लेशाम कारमपुरी , राधागोपाळ बंडी, तुळजाराम दोन्तुल, विजय साबळे आदींसह कार्यकर्ते आक्रमक झाले.

No comments:
Post a Comment