दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला UGC कडून स्वायत्त दर्जा; शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक यश
करमाळा (कटूसत्य वृत्त):- स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) 'स्वायत्त संस्था' (Autonomous) दर्जा प्राप्त केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या संस्थेला शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून हा दर्जा लागू होणार असून, यासंदर्भातील अधिकृत आदेश २९ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.
युजीसीच्या स्वायत्त महाविद्यालय नियमावली-२०२३ अंतर्गत हा दर्जा मंजूर करण्यात आला असून, महाराष्ट्रातील मोजक्याच महाविद्यालयांना हा मान मिळाला आहे. त्यामुळे दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा या संस्थांमध्ये समावेश होणे ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
स्वायत्त दर्जामुळे संस्थेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अनुषंगाने उद्योगाभिमुख, कौशल्याधारित आणि अद्ययावत अभ्यासक्रम तयार करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. तसेच नवीन पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणे, स्वतंत्र परीक्षा प्रणाली, जलद निकाल, सातत्यपूर्ण मूल्यमापन, संशोधन, इंटर्नशिप आणि कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे.
संस्थेने गेल्या काही वर्षांत गुणवत्तापूर्ण शिक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानांकन, परिषदांचे आयोजन, विविध विद्यापीठे व उद्योग संस्थांशी सामंजस्य करार, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक उत्कृष्टतेची भक्कम पायाभरणी केली आहे. या प्रयत्नांची दखल घेत यूजीसीने स्वायत्त दर्जा बहाल केला आहे.
संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास मधुकर झोळ यांनी या यशाबद्दल प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि सर्व हितचिंतकांचे अभिनंदन व आभार मानले. "हा स्वायत्त दर्जा ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाला मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील मान्यता असून, भविष्यात जागतिक दर्जाचे, कौशल्याधारित व संशोधनाभिमुख शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील," असे त्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment