शेगावच्या प्रसिद्ध पेढ्यांमध्ये भेसळ; नमुने असुरक्षित, विक्रेत्यांवर न्यायालयीन कारवाईचा इशारा
शेगाव (जि. बुलढाणा) (कटूसत्य वृत्त) :- शेगावच्या प्रसिद्ध पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, मंदिर परिसरातील दोन पेढा विक्री केंद्रांमधून जप्त करण्यात आलेले नमुने भेसळयुक्त आणि असुरक्षित असल्याचे नागपूर येथील अन्न प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संबंधित विक्रेत्यांवर परवाना निलंबनासह न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त प्रमोद पाटील यांनी सांगितले की, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला असून दोन्ही नमुने असुरक्षित आढळले आहेत. संबंधित विक्रेत्यांना नोटीस बजावून त्यांचे परवाने निलंबित करण्याबरोबरच न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रसिद्ध शेगाव मंदिर परिसरातील पेढ्यांच्या नमुन्यांचा अहवाल रखडल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने दखल घेतली. रखडलेला अहवाल मागवून घेतल्यानंतर भेसळयुक्त पेढ्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
एफडीएने गेल्या महिन्यात मंदिर परिसरातील दोन पेढा विक्री केंद्रांवर छापे टाकून सुमारे २५ किलो पेढे जप्त केले होते. हे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. महिनाभरानंतर प्राप्त झालेल्या अहवालात दोन्ही नमुने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे निष्पन्न झाले.
प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, एका दुकानातील पेढ्यांमध्ये दुधावर आधारित उत्पादनांसाठी अयोग्य मानले जाणारे फॉरेन फॅट अर्थात पामतेल वापरल्याचे आढळले. तर दुसऱ्या दुकानातील नमुन्यात कृत्रिम खाद्यरंगाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्ये धडक कारवाया सुरू असून, कोल्हापूर जिल्ह्यातील सहा बेकऱ्यांचे परवानेही नुकतेच निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधातील कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment