महापालिकेत ड्रेसकोडची कडक अंमलबजावणी; नियमभंग करणाऱ्यांवर दंडाची कारवाई
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त, एकसमान कार्यसंस्कृती आणि प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोडला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या सुमारे ७० टक्के अधिकारी व कर्मचारी नव्या गणवेशात नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत असून, शंभर टक्के अंमलबजावणीसाठी प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या निर्देशानुसार महापालिकेतील वर्ग ‘ब’ ते ‘ड’ मधील कायमस्वरूपी, मानधन तसेच कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निळ्या रंगाचा लाइनिंग शर्ट आणि गडद निळ्या (नेव्ही ब्ल्यू) रंगाची पँट, तर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी फिकट जांभळ्या रंगाची साडी किंवा त्याच रंगाचा पंजाबी ड्रेस निश्चित करण्यात आला आहे.
आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीचा अधिकृत गणवेश कायम ठेवण्यात आला आहे. ड्रेसकोडचे पालन न करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून प्रतिदिन १०० रुपयांचा दंड वसूल करण्याचे अधिकार संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांनी सांगितले की, ड्रेसकोडमुळे प्रशासनात शिस्तबद्धता आणि एकरूपता निर्माण होत असून, नागरिकांमध्येही प्रशासनाबाबत सकारात्मक संदेश जात आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांनीही नियमांचे पालन करावे यासाठी पुढील काळात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment