आरक्षण हा हक्क; सामाजिक न्याय पूर्ण होईपर्यंत आरक्षण आवश्यक-डॉ.हुलगेश चलवादी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 10, 2026

आरक्षण हा हक्क; सामाजिक न्याय पूर्ण होईपर्यंत आरक्षण आवश्यक-डॉ.हुलगेश चलवादी

आरक्षण हा हक्क; सामाजिक न्याय पूर्ण होईपर्यंत आरक्षण आवश्यक-डॉ.हुलगेश चलवादी



पुणे(कटूसत्य वृत्त):-  :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांनी संयत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आरक्षण ही केवळ तात्पुरती सवलत नसून सामाजिक विषमता आणि भेदभाव दूर करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने दिलेला हक्क आणि घटनात्मक संरक्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


समाजातील सामाजिक भेदभाव पूर्णपणे संपलेला नाही. वंचित, शोषित आणि मागास घटकांना आजही शिक्षण, रोजगार, प्रतिनिधित्व आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामाजिक न्यायाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेपर्यंत आरक्षणाची गरज कायम आहे, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.

मोहन भागवत यांनी सामाजिक भेदभाव अस्तित्वात असेपर्यंत आरक्षणाची गरज असल्याचे म्हटले आहे, ही बाब स्वागतार्ह असल्याचे सांगत डॉ.चलवादी म्हणाले, “मात्र आरक्षणाला केवळ सामाजिक उत्थानाचे साधन किंवा काही काळानंतर संपुष्टात येणारी व्यवस्था म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. आरक्षण हा भारतीय राज्यघटनेने वंचित समाजघटकांना दिलेला अधिकार आहे. हा अधिकार सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित करण्याच्या व्यापक घटनात्मक उद्देशाशी जोडलेला आहे.”

आरक्षणाचा लाभ घेतलेल्या व्यक्तींनी इतरांना संधी द्यावी, या भावनेशी व्यापक अर्थाने सहमत होताना डॉ. चलवादी यांनी त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली. “एखाद्या व्यक्तीला आरक्षणाचा लाभ मिळाला म्हणून त्या व्यक्तीच्या संपूर्ण समाजाचे सामाजिक मागासलेपण संपले असे होत नाही. व्यक्तीची प्रगती आणि संपूर्ण समाजाची सामाजिक स्थिती या दोन वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नाकडे केवळ वैयक्तिक लाभाच्या चौकटीत पाहता येणार नाही,” असे डॉ.चलवादी  म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून समानता, न्याय आणि प्रतिनिधित्वाचा मार्ग दिला. त्यामुळे आरक्षणाबाबत कोणतीही चर्चा करताना संविधानाची मूलभूत भूमिका केंद्रस्थानी असली पाहिजे. समाजातील शेवटचा वंचित घटक शिक्षण, रोजगार, प्रशासन आणि सत्तेच्या प्रक्रियेत समान पातळीवर येईपर्यंत आरक्षणाची आवश्यकता नाकारता येणार नाही, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.

आरक्षणामुळे कोणत्याही समाजघटकाविरुद्ध अन्याय करण्याचा उद्देश नाही. उलट, ऐतिहासिक आणि सामाजिक विषमतेमुळे निर्माण झालेली दरी कमी करून समान संधी निर्माण करणे हा आरक्षणाचा मूलभूत हेतू आहे.आरक्षण संपविण्याची चर्चा करण्यापेक्षा ज्या दिवशी समाजातील शेवटच्या घटकाला कोणत्याही भेदभावाशिवाय समान संधी, सन्मान आणि प्रतिनिधित्व मिळेल, त्या दिवशी आरक्षणाची गरज राहील का, हा प्रश्न समाजाने स्वतःला विचारावा,असे डॉ. हुलगेश चलवादी यांनी नमूद केले.

आरक्षणाच्या माध्यमातून वंचित घटकांना मिळालेल्या संधींचा विस्तार अधिक व्यापक सामाजिक न्यायात व्हावा, तसेच आरक्षणाबाबत समाजात गैरसमज निर्माण न करता घटनात्मक चौकटीत सकारात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages