आदिवासी संस्कृती, परंपरा आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश; गुणवंत विद्यार्थी, खेळाडू व नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा गौरव
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवारी (दि. ९ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता एमआयटी कॉलेजजवळील धनश्री फंक्शन हॉल येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरा, इतिहास, सामाजिक योगदान आणि निसर्गाशी असलेले नाते अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्ह्यासह विविध भागांतील आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारक आणि आदिवासी महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली. बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, टंट्या भिल, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, शमशेरसिंह पारधी, राणी दुर्गावती, जयपाल मुंडा, वीर एकलव्य यांच्यासह विविध क्रांतिकारक महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना व सलामी देण्यात आली.
यानंतर वृषाली पवार आणि अस्मिता वाळके यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची रंगत वाढवली. पारंपरिक वेशभूषेत सादर करण्यात आलेल्या आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. आदिवासी संस्कृती, लोकपरंपरा आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते यांचे प्रभावी दर्शन या सांस्कृतिक सादरीकरणातून घडले.
यावेळी वक्त्यांनी आदिवासी समाजाच्या इतिहासाचा आणि योगदानाचा गौरव करताना, "निसर्ग हा आमचा देव आहे, जंगल हे आमचे जीवन आहे आणि संस्कृती ही आमची ओळख आहे," हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. आदिवासी समाजाने मानवी संस्कृतीच्या जडणघडणीत दिलेले योगदान अनमोल असून, निसर्गसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समता आणि परंपरांचे जतन या मूल्यांची शिकवण आदिवासी संस्कृती आजही देत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या नवनियुक्त शासकीय कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी, उच्च शिक्षण प्राप्त युवक-युवती आणि खेळाडूंचा गुलाबपुष्प, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. यशस्वी युवक-युवतींच्या सत्कारामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विलास काळे होते. उद्घाटन सुधाकर भांगरे (प्रकल्प अधिकारी, सोलापूर) यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिगंबर काळे, लेखक व ट्रायबल अथॉरिटी फाउंडेशनचे संस्थापक विश्वनाथ धुमाळ, भाऊसाहेब गायकवाड (अध्यक्ष, आदिवासी शिक्षक संघटना, सोलापूर), धनंजय झाकिर्डे (प्रकल्प अधिकारी), लक्ष्मण टारपे, सोमनाथ साबळे, काश्मीर शिंदे (अध्यक्ष, सातारा), सुरेश पवार (संस्थापक महासचिव, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना), सचिन शिंदे (कोषाध्यक्ष), विजय काळे (जिल्हाध्यक्ष), सुरेश काळे (वस्तीगृह अधीक्षक, सोलापूर), प्रा. डॉ. नागोराव भुरके, मंगेश शिंदे (लेखा अधिकारी), विक्रांत काळे, हरिप्रसाद चव्हाण, गणेश पवार, सचिन पवार, प्रा. युवराज घनकुटे, रेणुकादास वाळके, संजय कराळे, ज्ञानेश्वर चाफे, संदीप कोटे, ज्ञानेश्वर कराळे, संतोष आम्ले, वर्षा भिसे, शंकर पोटे, कैलास डुकरे, शिवाजी बोरकर, दत्तू पवार, कैलास ठाकरे, शिवाजी पारधी, युवराज बोंबले, योगेश कोवे, संजय वंजारी, युती कराळे, स्नेहा वाघदकर, देवराम दुधाळकर, पांडुरंग नारायण गोरे, गंगाराम बेले, राणी शिंदे, रेश्मा शिंदे, निर्मला काळे, सुनिता काळे, संगीता काळे, रेश्मा पवार, सुंदर पवार यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन संदीप गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या टीमने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगासागर बेले यांनी प्रभावीपणे केले, तर लहू गभाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, इतिहास, सामाजिक एकजूट आणि शिक्षण, क्रीडा तसेच शासकीय सेवेत प्रगती करणाऱ्या युवक-युवतींचा गौरव करून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

No comments:
Post a Comment