राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पांना वेग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 14, 2026

राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पांना वेग

 राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पांना वेग

सीडब्ल्यूसीच्या मान्यतेनंतर याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला काम सुरू करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबई (कटूसत्य वृत्तसेवा) : राज्यातील सर्व भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी एकात्मिक जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पांना वेग देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. केंद्रीय जल आयोगाची (CWC) मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला नदीजोड प्रकल्पांची कामे सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (MWRRA) २१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

पश्चिम वाहिन्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पश्चिम वाहिनी नद्यांमधून समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणल्यास उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुटीची खोरी संतुलित करता येतील. या भागांना दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न आता हळूहळू पूर्णत्वाकडे जात आहे.

काही नदीजोड प्रकल्पांना मान्यता मिळाली असून, काही प्रकल्प सविस्तर प्रकल्प अहवालाच्या टप्प्यावर आहेत. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पांची कामे सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. नदीजोड प्रकल्पांमुळे दुष्काळी भागातही मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तुटीच्या खोऱ्यांना पाणी देण्यासाठी नदीजोड महत्त्वाचे

राज्यात शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. ज्या नदीखोऱ्यांमध्ये पाण्याची उपलब्धता अधिक आहे, तेथील पाणी पाणीटंचाई असलेल्या तुटीच्या खोऱ्यांमध्ये वळविण्यासाठी नदीजोड प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यामध्ये वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासह विविध नदीजोड प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांना आवश्यक त्या मंजुरी मिळाल्यानंतर कामांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माझगाव डॉक आणि जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात सामंजस्य करार

दरम्यान, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्यात जलप्रशुल्काच्या परिणामाचे मूल्यांकन, प्रकल्पांची सद्यस्थिती आणि आवश्यक उपाययोजनांबाबत सामंजस्य करार करण्यात आला.

या करारावर माझगाव डॉकचे संचालक कॅप्टन वासुदेव पुराणिक आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्वेताली ठाकरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

राज्यातील जलसंपत्तीचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करणे आणि पाणीटंचाई असलेल्या भागांना पाणी उपलब्ध करून देणे, या उद्देशाने नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages