‘बावनकुळे, मराठ्यांच्या नादी लागू नका; फडणवीसांनी आवरावे’
मनोज जरांगे-पाटील यांचा वैरागमध्ये सरकारला इशारा; २९ ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी न थांबण्याचे आवाहन
वैराग/माढा (कटूसत्य वृत्त) : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा देत संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘बावनकुळे यांनी मराठ्यांच्या नादी लागू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आवरावे,’ असे खडेबोल जरांगे-पाटील यांनी वैराग येथील सभेत सुनावले.
मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत जरांगे-पाटील यांनी सरकारला गंभीर परिणामांचा इशारा दिला. मराठा समाजाच्या भावना दुखावणाऱ्या भूमिका घेतल्या, तर त्याची राजकीय किंमत सरकारला मोजावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘मराठा समाज सरकार पाडायला कमी करणार नाही,’ असे सांगत त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी प्रलंबित ठेवू नये. सरकारने ठोस निर्णय घेऊन समाजाच्या मागण्या मार्गी लावाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारमधील नेत्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये आणि भूमिका टाळाव्यात, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
वैरागमध्ये जरांगे-पाटील यांचा सत्कार
वैराग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जरांगे-पाटील यांनी अभिवादन केले. त्यानंतर सकल मराठा समाज, बार्शी तालुक्याच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मराठा समन्वयक डॉ. कपिल कोरके यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
‘२९ ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी थांबू नये’
माढा (कटूसत्य वृत्त) : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत मनोज जरांगे-पाटील यांनी माढा येथे झालेल्या इशारा बैठकीत मराठा समाजाला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘लेकरं आणि समाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांना हालअपेष्टा भोगायला लावू नका. राजकीय नेत्यांना आतापर्यंत मोठं केलं; यापुढे असं करू नका. २९ ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी थांबू नये,’ असे आवाहन त्यांनी केले.
मराठा-कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. सत्य असतानाही प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा आरोप करत, ‘माझ्या समाजाच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.
‘माझ्या समाजाशी मी गद्दारी करत नाही, हा माझा दोष आहे का?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठा-कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी पत्र पाठविल्याचा आरोप करत जरांगे-पाटील यांनी त्यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सरकार आणि जरांगे-पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. वैराग आणि माढा येथील सभांमधून जरांगे-पाटील यांनी सरकारला थेट इशारा देत आंदोलनाची पुढील दिशा अधिक आक्रमक करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे २९ ऑगस्टच्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment