निवडणूक प्राधिकरणाकडे नव्या अर्हता तारखेची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 10, 2026

निवडणूक प्राधिकरणाकडे नव्या अर्हता तारखेची मागणी

 निवडणूक प्राधिकरणाकडे नव्या अर्हता तारखेची मागणी

प्रशासकांकडून सभासदांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर; अर्हता तारीख निश्चित झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग

सोलापूर (कटूसत्य वृत्त) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (डीसीसी) आणि सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेला आता वेग येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर खंडपीठाने दोन्ही सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नव्याने अर्हता तारीख निश्चित करण्याची मागणी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.

सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार मतदार यादी तयार करण्यासाठी निश्चित केलेली अर्हता तारीख आणि त्यावर आधारित सभासदांची यादी ठरावीक कालावधीसाठी निवडणुकीसाठी वापरता येते. यापूर्वी १ फेब्रुवारी २०२६ ही अर्हता तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, या अर्हता तारखेवर तयार झालेल्या मतदार यादीला सहा महिने पूर्ण होत असल्याने आता नव्याने अर्हता तारीख निश्चित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर ३१ जुलै रोजी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे नव्या अर्हता तारखेची मागणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. अर्हता तारीख निश्चित झाल्यानंतर त्यानुसार नव्याने सभासदांची यादी तयार करून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केली जाणार आहे.

प्रशासकांकडून सभासदांची यादी सादर

डीसीसी बँकेसह संबंधित सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकांकडून सभासदांची अद्ययावत यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. ही यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. अर्हता तारीख निश्चित झाल्यानंतर सभासदांची पात्रता तपासून त्यानुसार मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पुढे सुरू होईल.

मतदान प्रतिनिधींच्या ठरावाला महत्त्व

नवीन अर्हता तारीख निश्चित झाल्यानंतर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना त्यांच्या मतदान प्रतिनिधींचे ठराव करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. संबंधित संस्थांकडून मतदान प्रतिनिधींचे ठराव झाल्यानंतर त्याआधारे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविणे, त्यांची छाननी करणे आणि त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे.

डीसीसी बँक निवडणुकीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष

कोल्हापूर खंडपीठाच्या आदेशामुळे डीसीसी बँक आणि जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नव्या अर्हता तारखेपासून पुढील निवडणूक कार्यक्रम कसा आखला जातो, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

अर्हता तारीख निश्चित झाल्यानंतर सभासद यादी, मतदान प्रतिनिधींचे ठराव आणि प्रारूप मतदार यादी या टप्प्यांना वेग येणार असून, त्यानंतर निवडणुकीचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages