अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १४ सार्वजनिक ग्रंथालयांना विशेष निधीची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १४ सार्वजनिक ग्रंथालयांना विशेष निधीची मागणी

 अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १४ सार्वजनिक ग्रंथालयांना विशेष निधीची मागणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सन २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील १४ सार्वजनिक ग्रंथालयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या ग्रंथालयांना तातडीने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाने ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे 

जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे विविध ग्रंथालयांमधील पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे, फर्निचर तसेच इतर वाचन साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः माढा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांतील ग्रंथालयांना याचा मोठा फटका बसला आहे.


निवेदनानुसार, शंभर टक्क्यांपर्यंत नुकसान झालेल्या ग्रंथालयांमध्ये संगम सार्वजनिक वाचनालय, हेद्रा (ता. अक्कलकोट), कै. डॉ. केशवराव राजेगावकर सार्वजनिक वाचनालय, तेलगाव (सिना, ता. उत्तर सोलापूर), श्री. एम. बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय, पाकणी, बकुळाबाई सार्वजनिक वाचनालय, मनगोळी, छत्रपती संभाजी राजे सार्वजनिक वाचनालय, अकोले (मंद्रुप), राजमाता रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालय, पोर्ट, माळी सार्वजनिक वाचनालय, वाकाव, समता सार्वजनिक वाचनालय, सुलतानपूर, जय मल्हार सार्वजनिक वाचनालय, शिंगेवाडी, बालाजी सार्वजनिक वाचनालय आदींचा समावेश आहे.


या ग्रंथालयांमधील हजारो पुस्तके पूर्णतः भिजून निकामी झाली असून, अनेक पुस्तके वाचण्यायोग्य राहिलेली नाहीत. काही ठिकाणी ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत पुस्तकांचे नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पाण्यामुळे पुस्तकांची पाने चिकटणे, शाई पसरून अक्षरे नष्ट होणे तसेच बांधणी सुटणे यामुळे वाचनासाठी पुस्तके वापरणे अशक्य झाले आहे.


ग्रामीण भागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही ग्रंथालये ज्ञानाचे महत्त्वाचे केंद्र आहेत. पुस्तकांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील वाचन चळवळीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याने शासनाने या नुकसानीची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


जिल्हा ग्रंथालय संघाने जिल्हा नियोजन समिती (DPDC) अथवा उपलब्ध शासकीय योजनांमधून विशेष निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. तसेच तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन कामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशीही विनंती करण्यात आली आहे.


ग्रंथालय संघाच्या प्रमुख मागण्या :


- अतिवृष्टीग्रस्त १४ सार्वजनिक ग्रंथालयांसाठी विशेष निधी मंजूर करावा.

- निधीला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी.

- नुकसानग्रस्त ग्रंथालयांच्या दुरुस्ती व साहित्य खरेदीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत.


शासनाच्या सकारात्मक हस्तक्षेपामुळे ग्रामीण भागातील वाचन चळवळीला पुन्हा बळ मिळेल, असा विश्वास सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाने व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages