छत्रपती शिवाजी महाराज चौकाला ऐतिहासिक वैभवाची झळाळी
भव्य भिंतीशिल्पाचे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या आकर्षक व ऐतिहासिक भिंतीशिल्पाचे उद्घाटन आज मनोज जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती होती.
महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या भिंतीशिल्पामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला ऐतिहासिक तसेच आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे भिंतीशिल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिक, शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे एक प्रेरणादायी स्थळ म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले. शिवरायांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील सार्वजनिक ठिकाणी अशा ऐतिहासिक स्वरूपाच्या उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
या कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी ताई देवकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, मध्यवर्ती महामंडळाचे पद्माकर नाना काळे, दिलीप भाऊ कोल्हे, राजन जाधव, नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, जयवंत सलगर, लता फुटणे, प्रकाश ननवरे, मतीन बागवान, नागेश वडणे, सचिन स्वामी, देविदास घुले, बसवराज कोळी, बजरंग जाधव यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, शिवप्रेमी नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भिंतीशिल्पामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सौंदर्यात भर पडली असून, सोलापूर शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाला नवी ओळख मिळण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या या शिल्पाच्या माध्यमातून इतिहास केवळ पाहता येणार नसून, त्यातून स्वराज्य, शौर्य आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणाही नागरिकांना मिळणार आहे.

No comments:
Post a Comment