राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश; १५ ऑगस्टचे आंदोलन स्थगित
करमाळा (कटूसत्य वृत्त):- उमरड येथील धोकादायक ठिकाणी गतिरोधक उभारावेत, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने आंदोलनकर्त्यांनी सुचविलेल्या ठिकाणी गतिरोधकांची उभारणी केली आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेले रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी केली आहे.
कुंभेज फाटा ते रामवाडी या मार्गावरील उमरड परिसरातील धोकादायक ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या करमाळा उपविभागाकडे गेल्या दोन महिन्यांपासून पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, मागणीची पूर्तता होत नसल्याने १५ ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
या आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेतल्याचे दिसून आले. शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी उमरड येथील आंदोलनकर्त्यांनी मागणी केलेल्या सर्व ठिकाणी गतिरोधकांची उभारणी करण्यात आली.
उमरड येथील कोठावळे शॉपिंग सेंटरजवळील धोकादायक वळण तसेच चौधरी वलटे वस्ती परिसरातील रस्ता या दोन्ही ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात आली होती.
गतिरोधकांची उभारणी झाल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यात या ठिकाणी अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रस्तावित आंदोलनाला गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. मात्र, मागणी मान्य झाल्याने १५ ऑगस्ट रोजीचे रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती राजाभाऊ कदम यांनी दिली.

No comments:
Post a Comment