कर्करोगग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी हक्काचे ₹९.७५ लाख मिळेना; ग्रामपंचायतीविरोधात आत्मदहनाचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 15, 2026

कर्करोगग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी हक्काचे ₹९.७५ लाख मिळेना; ग्रामपंचायतीविरोधात आत्मदहनाचा इशारा

 कर्करोगग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी हक्काचे ९.७५ लाख मिळेना; ग्रामपंचायतीविरोधात आत्मदहनाचा इशारा


टेंभुर्णी ग्रामपंचायतीवर अनामत रक्कम थकवल्याचा आरोप; १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-  अकोले खुर्द (ता. माढा) येथील संजय गणपत माळी यांनी टेंभुर्णी ग्रामपंचायतीकडे जमा असलेली ₹९ लाख ७५ हजारांची अनामत रक्कम परत मिळत नसल्याचा आरोप करत, १४ ऑगस्टपर्यंत रक्कम न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय माळी यांनी ऑगस्ट २०१२ मध्ये टेंभुर्णी ग्रामपंचायतीचा गाळा लिलावाद्वारे घेताना ₹१० लाख २५ हजारांची अनामत रक्कम जमा केली होती. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी ८ डिसेंबर २०२३ रोजी गाळ्याचा ताबा ग्रामपंचायतीकडे परत दिला. त्यानंतर ग्रामपंचायतीने केवळ ₹५० हजारांचा धनादेश दिला असून उर्वरित ₹९.७५ लाखांची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असा त्यांचा दावा आहे.
दरम्यान, माळी यांच्या वडिलांवर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च होत आहे. उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असताना स्वतःचीच अनामत रक्कम मिळत नसल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही "सध्या निधी उपलब्ध नाही" असे कारण देत रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर संजय माळी यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती कुर्डुवाडी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. तसेच १४ ऑगस्टपर्यंत थकीत रक्कम न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनम गेटसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे टेंभुर्णी परिसरात चर्चा सुरू असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित प्रकरणाची चौकशी करावी आणि योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages