धोकादायक कॉर्नरवर गतिरोधकासाठी उमरडकरांचा एल्गार; १५ ऑगस्टला रस्ता रोको
करमाळा (कटूसत्य वृत्त):- कुंभेज फाटा ते रामवाडी या रस्त्यावर उमरड परिसरातील धोकादायक ठिकाणी गतिरोधक उभारण्यात यावेत, या मागणीसाठी उमरड ग्रामस्थांच्या वतीने १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उमरड परिसरातील कुंभेज फाटा ते रामवाडी रस्त्यावर गतिरोधक उभारण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग, करमाळा येथील उपअभियंत्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, अद्याप संबंधित ठिकाणी गतिरोधक उभारण्यात आले नसल्याने ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
उमरड येथील कोठावळे शॉपिंग सेंटरजवळ रस्त्यावर धोकादायक कॉर्नर असून, याच ठिकाणाहून एका बाजूला पूर्व सोगावच्या दिशेने, तर दुसऱ्या बाजूला उमरड गावातील बाजार तळाच्या दिशेने रस्ता जातो. या परिसराच्या जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असल्याने विद्यार्थी व नागरिकांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच चौधरी वलटे वस्ती परिसरात रस्ता बोगद्यातून जात असून, त्याठिकाणी मोठा कॉर्नर आहे. या परिसराच्या जवळ जिल्हा परिषद शाळा असून, बोगद्यातून पोंधवडीच्या दिशेने जाणारा रस्ताही आहे. त्यामुळे या ठिकाणीही वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक उभारण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
निवेदनानुसार, या दोन्ही ठिकाणी यापूर्वी अपघात झाले असून त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जणांच्या पायांना दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, विजय सोनवणे यांच्या घरावर सिमेंट खडी घेऊन जाणारा दहा चाकी टिपर पलटी झाल्याची घटनाही घडली आहे. परिसरातील अपघातांच्या पार्श्वभूमीवर उमरड ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी तातडीने गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी उमरड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे राजाभाऊ कदम यांनी सांगितले आहे. या संदर्भातील निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, करमाळा तहसीलदार, करमाळा पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभाग करमाळा यांना देण्यात आल्या आहेत.
ग्रामस्थांच्या मागणीवर संबंधित प्रशासनाकडून काय कार्यवाही केली जाते, याकडे आता उमरड ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment