दहिगांव जैन मंदिरात झालेल्या चोरी संदर्भात पोलीस प्रशासनास निवेदन
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- दहिगांव, ता. माळशिरस येथे दि. ५ च्या रात्री ते ६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या दरम्यान झालेल्या चोरीच्या घटनेचा तातडीने सखोल तपास करून आरोपींना अटक करून चोरीस गेलेला धार्मिक ऐवज शक्य तितक्या लवकर हस्तगत करण्यात यावा याबाबत नातेपुते येथील श्री १००८ चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या वतीने नरेंद्र गांधी, बाहुबली चंकेश्वरा, महावीर दोशी, अमृतलाल गांधी, दहिगांव जैन मंदिर ट्रस्टी उंदत शहा यांनी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना निवेदन दिले.
या देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हणण्यात आले आहे की, श्री १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, दहिगांव, ता. माळशिरस, दि. ५ च्या रात्री ते ६ ऑगस्ट रोजी पहाटे या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी मंदिरामध्ये प्रवेश करून चोरीची गंभीर घटना घडवून आणली आहे.सदर घटनेमध्ये मंदिरातील ३ चांदीच्या मूर्ती, चांदीचे छत्र, सोन्याचा मुलामा दिलेला कळसाचा बेस तसेच दानपेटी व काचेची दानपेटी फोडून त्यामधील रोख रक्कम असा ५ ते ८ लाख किमतीचा मौल्यवान ऐवज चोरीस गेलेला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून, धार्मिक स्थळाच्या सुरक्षिततेबाबत तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारी आहे. चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश असल्याने या घटनेमुळे संपूर्ण जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.तरी श्री १००८ चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, नातेपुते यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करण्यात आहे की, सदर प्रकरणाचा तातडीने, सखोल व सर्व बाजूंनी तपास करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात यावा. मंदिर परिसर तसेच आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज, संभाव्य ये-जा मार्ग, संशयित व्यक्ती तसेच चोरीस गेलेल्या वस्तूंच्या विक्री अथवा विल्हेवाटीच्या अनुषंगाने आवश्यक ती चौकशी करण्यात यावी. व चोरीस गेलेल्या चांदीच्या मूर्ती, छत्र व इतर धार्मिक वस्तू स्थानिक अथवा इतर ठिकाणच्या सराफ बाजारामध्ये विक्रीस अथवा वितळण्यासाठी आणल्या जाण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित सराफ व्यावसायिकांना आवश्यक त्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात याव्यात.तसेच सदर गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी व चोरीस गेलेला धार्मिक ऐवज शक्य तितक्या लवकर हस्तगत करण्यात यावा, ही नम्र विनंती नातेपुते येथील श्री १००८ चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आली असून धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दहिगांव परिसरात आवश्यक ती पोलीस गस्त व प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढविण्याबाबतही योग्य ती कार्यवाही करण्यात यावी या आशेचे निवेदन जैन मंदिराचे ट्रस्टी व पदाधिकारी यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment