दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश; वाशिंबे येथे दौंड–कलबुर्गी शटलला थांबा
करमाळा (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील वाशिंबे रेल्वे स्टेशनवर दौंड–कलबुर्गी शटलला प्रवासी थांबा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वाशिंबे तसेच परिसरातील सोगाव, मांजरगाव, गोयेगाव, उंदरगाव, राजुरी आदी गावांतील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाली असून, रेल्वे प्रवासाची सुविधा अधिक सुलभ होणार आहे.
या थांब्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारे सुयोग झोळ यांनी रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाची माहिती दिली. प्रवासी सेवा संघ, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था तसेच पत्रकार बांधवांच्या सहकार्यामुळे ही मागणी रेल्वे प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवता आली, असे झोळ यांनी सांगितले.
दौंड–कलबुर्गी शटलला वाशिंबे येथे थांबा मिळावा, यासाठी प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. ओमराजे निंबाळकर, माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते दिग्विजय बागल, नगरसेवक दीपक चव्हाण, संचालक गणेश झोळ, भाजप अध्यक्ष सचिन पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमरजीत साळुंके, जेऊर प्रवासी असोसिएशनचे सुहास सूर्यवंशी आणि प्रदीप पवार यांचे सहकार्य लाभले.
तसेच सोगाव, वाशिंबे, मांजरगाव, गोयेगाव, उंदरगाव आणि राजुरी येथील ग्रामपंचायती, अभिनव माध्यमिक विद्यालय, शरदचंद्रजी पवार विद्यालय, राजेश्वर विद्यालय आणि पत्रकार संघ यांनीही या मागणीसाठी सहकार्य केले.
गेल्या दोन वर्षांत या मागणीसाठी शेकडो निवेदने सादर करण्यात आली. ई-मेल व दूरध्वनीद्वारे रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या, तसेच वृत्तपत्रांमधून सातत्याने या प्रश्नाला प्रसिद्धी देण्यात आली. त्यामुळे वाशिंबे रेल्वे स्थानकावरील प्रवासी थांब्याची मागणी सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. अखेर रेल्वे बोर्डाने दौंड–कलबुर्गी शटलला वाशिंबे येथे प्रवासी थांबा मंजूर केला. या निर्णयामुळे परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच दैनंदिन कामानिमित्त रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. वाशिंबे आणि परिसरातील गावांना रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून अधिक चांगली जोडणी मिळण्यास या निर्णयामुळे मदत होणार आहे.
सकाळच्या सत्रातील पुणे दिशेच्या थांब्यासाठीही प्रयत्न
दौंड–कलबुर्गी शटलला वाशिंबे येथे थांबा मिळाल्यानंतर आता सकाळच्या सत्रात पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेला वाशिंबे येथे थांबा मिळावा, यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सुयोग झोळ यांनी सांगितले. याबाबतही रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
.......चौकट......
“दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा केला”
“ही मागणी केवळ कागदावर मांडली नाही, तर गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. या काळात अनेक अडचणी आल्या, काही वेळा निराशाही वाटली; मात्र प्रयत्न थांबवले नाहीत. या निर्णयामध्ये प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. परिसरातील ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था आणि पत्रकार बांधवांच्या सहकार्यामुळे ही मागणी पुढे नेता आली. आता सकाळच्या सत्रात पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेलाही वाशिंबे येथे थांबा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याबाबतही सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.”
— सुयोग झोळ, वाशिंबे (ता. करमाळा)
%20(1).png)
No comments:
Post a Comment