पैलवान सत्यवान चव्हाण यांची पीएसआयपदी निवड; तांदुळवाडीत कौतुकाचा वर्षाव
अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षा २०२६ मध्ये माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील नामांकित पैलवान सत्यवान दादासाहेब चव्हाण यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. कुस्तीच्या आखाड्यात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवल्यानंतर स्पर्धा परीक्षेतही उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सत्यवान चव्हाण यांच्या यशाचा तांदुळवाडी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात गौरव केला.
ग्रामपंचायत तांदुळवाडी तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यांमध्ये सत्यवान चव्हाण यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे तांदुळवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, गावातील युवकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यास सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव, पंचायत समिती सदस्य शिवराज पूकळे, माजी उपसरपंच शशिकांत कदम चव्हाण परिवार, सतीश कदम, सर्जेराव चव्हाण, बापू बाबर, उद्योजक बापू चव्हाण, भगवान काकडे , महादेव फडतरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यानंतर बौद्ध विहार येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी सत्यवान चव्हाण यांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार डी. एस. गायकवाड, चालक संघटनेचे दादासाहेब धांडोरे, बाबासाहेब धांडोरे, सचिन गायकवाड, राहुल काटे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
गावातील विविध ठिकाणी झालेल्या सत्कार सोहळ्यांमुळे तांदुळवाडीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. “कुस्तीच्या आखाड्यात नाव कमावणाऱ्या आपल्या गावच्या सुपुत्राने आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून नवी जबाबदारी स्वीकारली आहे,” याचा ग्रामस्थांना विशेष अभिमान असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. सत्यवान चव्हाण यांच्या यशाबद्दल तांदुळवाडी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सत्यवान चव्हाण यांनी कुस्ती क्षेत्रात नामांकित पैलवान म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आखाड्यातील संघर्ष, शिस्त आणि सातत्य कायम ठेवत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली. त्यामुळे त्यांचे हे यश तांदुळवाडीतील युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
कोट
- युवकांना दिला यशाचा मंत्र
सत्काराला उत्तर देताना सत्यवान चव्हाण यांनी आपल्या यशामागील मेहनत, जिद्द आणि सातत्याचा अनुभव सांगत युवकांना मार्गदर्शन केले. ध्येय निश्चित करा, मेहनतीला पर्याय नाही, अपयशाने खचू नका आणि सातत्याने प्रयत्न करत राहा, असा यशाचा मंत्र त्यांनी युवकांना दिला. कुस्तीच्या आखाड्यातील शिस्त आणि मेहनतीचा उपयोग स्पर्धा परीक्षेच्या तयारीतही झाल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
- चव्हाण घराण्याचा दैदिप्यमान वारसा; कुस्तीपासून देशसेवेपर्यंतची प्रेरणादायी परंपरा
चव्हाण घराण्याला कुस्तीची समृद्ध आणि दैदिप्यमान परंपरा लाभली आहे. सत्यवान चव्हाण यांचे वडील पैलवान दादासाहेब चव्हाण हे नामांकित पैलवान व वस्ताद, तर आजोबाही कुस्ती क्षेत्रातील मोठे पैलवान होते. अस्वलाच्या कुस्तीतील पराक्रमाचीही या घराण्याची विशेष ओळख आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी संपत्ती चव्हाण यांनी देशसेवेचा आदर्श निर्माण केला. संपत्ती विठोबा चव्हाण हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अंगरक्षक होते.स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल संपत्ती विठोबा चव्हाण यांना तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हस्ते ताम्रपट, तर वसंतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. कुस्तीचा वारसा, देशसेवेचे संस्कार आणि कष्टाची परंपरा जपत चव्हाण कुटुंबातील पुढील पिढीनेही यशाची भरारी घेतली असून, सत्यवान चव्हाण यांची पोलीस उपनिरीक्षकपदी झालेली निवड आणि बाबासाहेब दादासाहेब चव्हाण हे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे एकात्मिक पीक शेती प्रकल्पात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.या दैदिप्यमान वारशाचा अभिमानास्पद अध्याय आहे.
.png)
No comments:
Post a Comment