बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कडक कारवाईची मागणी
बँक कर्मचारी व अधिकारी यांचे निवेदन
लातूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र च्या सर्व अधिकारी व कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन लातूर विभागाचे झोनल मॅनेजर यांना याबाबत निवेदन देऊन आणि अशा गावगुंडापासून संरक्षण देण्याची मागणी केली.
या निवेदनातून संघटनांनी असा संताप व्यक्त केला आहे की,अगोदरच सर्व बँकांची कर्मचारी संख्या अत्यंत त्रोटक आहे.रोजची कामे संपविणे हेच जिकिरीचे होत असताना त्यातून या कर्जमाफी मुळे होणाऱ्या गर्दीमुळे त्रासाची भर पडत आहे.
सर्व बँक कर्मचारी आपल्या खातेदार शेतकरी बांधवासोबत असून सुद्धा काही उद्दाम लोक त्यांच्या नेतेगिरीसाठी बँक कर्मचाऱ्यावर हल्ला करीत आहेत. अशावेळी वरिष्ठ बँक अधिकारी यांनी अशा गुंडगिरीपासून कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, पोलिस प्रशासनाकडे गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरावा.कायदेशीर वकील पुरवावे तसेच शासकीय कामकाजातील अडथळ्याचे गंभीर गुन्हे दाखल करावेत अशा विविध मागण्या केल्या. जर अशी कोणती अप्रिय घटना कोणत्याही बँक शाखेत घडली तर तेथील शाखेत कामकाज किमान एक महिना बंद करू असा इशाराही यावेळी कर्मचारी संघटनांनी व्यवस्थापनास दिला.
या वेळी बँक कर्मचारी संघटनेचे कॉ. उत्तम होळीकर, कॉ.दीपक माने, कॉ.विवेक पदरे, कॉ.रेश्मा भवरे, कॉ.संभाजी गर्जे, कॉ. प्रिया पवार, कॉ.मयुर प्रयाग, कॉ.महेश घोडके, कॉ.उदय मोरे, कॉ. गजानन औटी यांचेसह अनेक बँक अधिकारी व कर्मचारी यांनी झोनल मॅनेजर राजेश कुमार आणि डेप्युटी झोनल मॅनेजर पार्डीकर यांना संयुक्त निवेदन देऊन संरक्षण देण्याची आणि सर्व शाखेतून सुरक्षा रक्षक नेमण्याची आग्रही मागणी केली.
या सर्व मागण्या उचित असून वरिष्ठ व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि अशा दुर्दैवी घटना घडल्यास तत्काळ पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन राजेश कुमार आणि पार्डीकर यांनी या शास्तमंडळास दिले.
.png)
No comments:
Post a Comment